बाईचा नाद सुटला, पण बाटलीचा सुटेना, सिराजवर ४९ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:34 AM2021-01-19T04:34:54+5:302021-01-19T04:34:54+5:30
बीड : बाई आणि बाटलीच्या नादापाई घरफोड्यांमध्ये मास्टर माईंड असलेला सय्यद सिराज लियाकतवर तब्बल ४९ गुन्हे दाखल आहेत. मौजमजा ...
बीड : बाई आणि बाटलीच्या नादापाई घरफोड्यांमध्ये मास्टर माईंड असलेला सय्यद सिराज लियाकतवर तब्बल ४९ गुन्हे दाखल आहेत. मौजमजा करण्यासाठी तो चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांत त्याने बाईचा नाद सोडून कुटूंबासोबत वेळ घातला. पण बाटलीचा नाद न सुटल्याने तो चोरी करणे थांबवित नसल्याचे सूत्रांकडून समजते.
एखाद्या व्यक्तीला बाई आणि बाटलीचा नाद लागला की तो कोणत्याही थराला जावू शकतो, याची अनेक उदाहरणे आहेत. असेच हे उदाहरण बीडमधील आहे. सय्यद सिराज लियाकत (वय ३५ रा. पूरग्रस्त कॉलनी, बीड) हा साधारण वयाच्या ८ व्या वर्षांपासूनच चोरीकडे वळला. सुरूवातीला तो भंगार चोरायचा. नंतर त्याच्या ओळखी कुख्यात आरोपींसोबत झाल्या. त्याने नंतर घरफोड्या करण्याकडे मोर्चा वळविला. सुरूवातीला बीड आणि नंतर अहमदनगर, जालना आदी शेजारील जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. रविवारी त्याला स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधील दोन गुन्ह्यात बेड्या ठोकल्या. या दोन गुन्ह्यांसह त्याच्यावर तब्बल ४९ गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. सिराज हा कुख्यात गुन्हेगार आहे. एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्याने आपली चोरीची सवय सोडली नसल्याचे दिसते.
कुटूंबाला दिला वेळ
सिराज हा विवाहित आहे. त्याला तीन मुली आणि दोन मुले आहेत. मागील काही दिवसांपासून त्याने चोऱ्या करणे बंद केले होते. एका नॉनव्हेजच्या दुकानावर तो कामाला होता. नंतर काही दिवस भाजीपाला विक्री केला. परंतु यातून येणारा पैसा त्याला कमी पडत होता. शिवाय मेहनत करावी लागायची. त्यामुळेच तो पुन्हा चोरीकडे वळल्याचे सांगण्यात आले. चोरीतील सर्व पैसे त्याने दारूसाठी उडविल्याचे सांगण्यात आले.
कोट
सिराज हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. बीड शहरातील दोन गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत केला आहे.
भारत राऊत
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड