बीडमध्ये छेडछाडीमुळे महिला व मुली असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:10 AM2017-12-30T00:10:05+5:302017-12-30T00:11:33+5:30

घरातून बाहेर पडल्यापासून ते परत येईपर्यंत महिला व मुली असुरक्षित असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून समोर येत आहे. त्यांच्या मनात आजही ‘भय’ कायम आहे. रोडरोमिओ, मद्यपी यांच्या वासनेसह विकृत नजरेचा सामना त्यांना करावा लागत आहे. यातून मार्ग काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप तरी त्यांना यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याचे गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील घटनेवरुन समोर आले आहे. याच घटनेला धरून आढावा घेतला असता ‘भय इथले संपत नाही..!’ अशीच परिस्थिती समोर आली.

Women and girls are insecure due to drunken bead | बीडमध्ये छेडछाडीमुळे महिला व मुली असुरक्षित

बीडमध्ये छेडछाडीमुळे महिला व मुली असुरक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देभय इथले संपत नाही...

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरातून बाहेर पडल्यापासून ते परत येईपर्यंत महिला व मुली असुरक्षित असल्याचे वारंवार घडणा-या घटनांवरून समोर येत आहे. त्यांच्या मनात आजही ‘भय’ कायम आहे. रोडरोमिओ, मद्यपी यांच्या वासनेसह विकृत नजरेचा सामना त्यांना करावा लागत आहे. यातून मार्ग काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप तरी त्यांना यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याचे गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील घटनेवरुन समोर आले आहे. याच घटनेला धरून आढावा घेतला असता ‘भय इथले संपत नाही..!’ अशीच परिस्थिती समोर आली.

तळवट बोरगाव येथील विद्यार्थिनी गढी येथे महाविद्यालयात येत असताना गावातीलच सचिन गाडे व दीपक गाडे या दोन रोमिओंनी तिची छेड काढली. कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या बदनामीच्या भीतीने पीडित विद्यार्थिनीने आजोबाच्या दमा आजाराच्या तब्बल ३० गोळ्या गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोन रोमिओंना तलवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटनेवरून आजही महिला व मुलींना छेडछाडीला तोंड द्यावे लागत असल्याचे समोर आले होते.

शिकवणी, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सध्या रोडरोमिओंचे टोळके बसलेले दिसून येतात. ये-जा करणाºयांना टोमणे मारण्यासह त्यांच्याकडे विकृत नजरेने पाहतात. एवढेच नव्हे तर मुलींच्या दुचाकी, सायकल व पायी चालणाºयांना आडवे उभे राहून ‘प्रेमाचा इजहार’ करण्यासारखे प्रकार वाढले आहेत. यामुळे मुली रस्त्याने जाताना घाबरत आहेत. काही मुली तर आपल्या पालकांना सोबत घेऊन येत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

छेडछाडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवून रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वी चिडीमार व गस्त पथकाची स्थापना केली. चिडीमार पथकात सहायक फौजदारासह महिला पोलीस शिपाई, पुरूष कर्मचाºयांची नियुक्ती केली. गस्त पथकातही सहा महिला कर्मचारी नियुक्त करून जिल्ह्यात कारवाया करण्याचे आदेश दिले. सुरुवातीला या दोन्ही पथकांनी जोमाने कारवाया करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मात्र हे पथक दिवसेंदिवस सुस्त होत गेले, त्यांच्या कारवाया थंडावल्या. उलट गस्त पथकाच्याच तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून नंतर हे गस्त पथक बंद करण्यात आले.

चिडीमार पथकाचीही यापेक्षा वेगळी अवस्था नव्हती. सुरूवातील चांगल्या कारवाया झाल्यानंतर पुन्हा त्या थंडावल्या. त्यामुळे रोमिओंची संख्या वाढत गेली. छेडछाडीच्या घटनांही वाढत गेल्या. पूर्वी जो या पथकाचा वचक होता, तो आता राहिला नाही. या पथकानेही शिकवण्या, शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्याची औपचारिकता पूर्ण केली. पूर्वी या भेटी मन:पूर्वक असत, त्यामुळे सर्वांकडे या पथकाचा मोबाईल क्रमांक होता. मुलींना पथकाबद्दल विश्वास होता. परंतु आता या पथकाने हा विश्वास गमावला असून, संपर्क क्रमांकही मुलींकडे नसल्याचे समोर आले आहे.

मुली म्हणतात, पोलिसांनी गस्त घालावी...!
छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नेमलेली पथके सुस्त झाल्याचा आरोप शहरातील काही मुलींनी केला. या पथकांनी रोड रोमिओ असलेल्या ठिकाणी व शाळा-महाविद्यालये, शिकवणीच्या परिसरात किमान गस्त घालावी. त्यामुळे नक्कीच आम्हाला दिलासा मिळेल, अशी मागणी महाविद्यालयीन तरुणींनी केली.

पथके स्थापन
जिल्हाभरात छेडछाडीला आळा बसविण्यासाठी पथके स्थापन केली आहेत. त्यांना सक्रिय होऊन कारवाया करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. ज्यांंना काही त्रास होत असेल, त्यांनी तात्काळ पथके किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तात्काळ मदत केली जाईल. तक्रार देण्यासाठी महिला व मुलींनी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही तात्काळ त्यावर कार्यवाही करु.
- जी. श्रीधर
पोलीस अधीक्षक, बीड.

१० महिन्यांत १९४ विनयभंग ५७ बलात्कार
जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ या दहा महिन्यांत तब्बल १९४ विनयभंगाचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच बलात्कारांचे ५७ गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये एका सामूहिक अत्याचाराचाही समावेश आहे. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यात महिला व मुली किती सुरक्षित आहेत, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे हे सर्व कृत्य करणारे ओळखीचे व नातेवाईक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात १२ दामिनी पथके स्थापन
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी छेडछाडीचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पथकातील जुन्या कर्मचाºयांची उचलबांगडी करून नव्यांची नियुक्ती केली आहे.
तसेच जिल्हा पथकासह प्रत्येक तालुक्यांमध्ये १ अशी ११ पथके स्थापन केली आहेत. या सर्वांना दामिनी पथक असे नाव देण्यात आले आहे.
१६ डिसेंबरपासून ही पथके कार्यरत झाली आहेत. अधीक्षकांचा विश्वास ही पथके कितपत सार्थ ठरवितात, हे येणारा काळच ठरविणार आहे.

१२ दिवसांची कामगिरी
जिल्ह्यात नियुक्त केलेल्या १२ दामिनी पथकांनी ११७ शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या, तसेच ७१ कारवायाही केल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा बंदोबस्त असल्यामुळे कारवायांत घट झाल्याचे संबंधित विभागाने सांगितले; परंतु यापुढे ही पथके अधिक जोमाने कामे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Women and girls are insecure due to drunken bead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.