महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत; पोलीस यंत्रणा कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 07:21 PM2021-03-16T19:21:24+5:302021-03-16T19:25:24+5:30
स्त्रियांवरील अत्याचार भाजप महिला आघाडी कदापीही सहन करणार नसून या लाजिरवाण्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा
अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील कोपरा (जि.लातूर) येथील २६ वर्षीय तरुणीचा गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने विनयभंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा प्रकार संतापजनक आहे. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून भर चौकात शिक्षा द्यावी अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली. त्यांनी मंगळवारी (दि.१६) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पिडीतेची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली.
कोपरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शुक्रवारी (दि.१२) दुपारी २६ वर्षीय पिडीतेच्या घरासमोर सार्वजनिक बांधकाम करताना माझी आई बाहेर गेली आहे, आल्यानंतर काम करा, असे सांगूनही आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून तरुणीचा विनयभंग करत मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सरपंचासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पिडीत तरुणीवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी (दि.१६) भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, आ. रमेश कराड यांनी रुग्णालयात पिडीतेची भेट घेतली.
यावेळी खापरे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. घटनेच्या चार दिवसानंतरही फक्त दोघांना अटक करणारे पोलीस आरोपींना पाठीशी घालण्यात धन्यता मानत आहेत. पोलीस यंत्रणा कुचकामी झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचार भाजप महिला आघाडी कदापीही सहन करणार नसून या लाजिरवाण्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी खापरे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.