बीडमध्ये १०८ रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 06:06 PM2019-05-27T18:06:03+5:302019-05-27T18:07:00+5:30
आई आणि बाळाची तब्येत ठणठणीत आहे
बीड : रूग्णालयात आणत असताना रूग्णवाहिकेतच महिलेची प्रसुती झाली. हा प्रकार सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील पाली येथे घडला. बाळ व आईला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संगिता कालीदास पवार (रा.बोरखेड ता.बीड) असे या मातेचे नाव आहे. संगिता यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना सोमवारी दुपारी १०८ रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात आणले जात होते. मात्र घाट उतरवून खाली पाली जवळ येताच तिच्या कळा वाढल्या. याच दरम्यान रूग्णवाहिका थांबविण्यात आली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्याच रूग्णवाहिकेतून संगिता यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. येथे बालीका तांदळे या परिचारीकेने त्यांना पूर्ण मदत केली. बाळाला अतिदक्षता विभागात दाखल केले तर मातेवर प्रसुती विभागात उपचार करण्यात आले. संगिता यांना यापूर्वी एक मुलगी आहे. दरम्यान, सध्या बाळ आणि आई दोघांची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.