पती, २ प्रियकरांच्या मदतीने प्रेयसीने काढला तिसऱ्या प्रियकराचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:29 PM2019-05-08T13:29:17+5:302019-05-08T13:32:06+5:30
पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
बीड / कडा : तीन दिवस बाहेरगावी जाऊन मजा मारून आल्याची बाब पतीसह इतर प्रियकरांना खटकली. त्यानंतर बंडखोर झालेल्या प्रेयसीने पती आणि दोन प्रियकरांच्या मदतीने तिसऱ्या प्रियकराचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आला आहे. यातील पती, प्रेयसी आणि एका प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात हा प्रकार घडला होता.
नितीन रामा साबळे, असे मृताचे नाव असून संतोष सकट, सोन्या ऊर्फ सागर शेख, गुलशन शेख यासह इतर तिघांचा आरोपींत समावेश आहे. आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात बीड-नगर रोडलगत असलेल्या विहिरीत २५ एप्रिल रोजी कुजलेले अनोळखी प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी हे प्रेत ताब्यात घेत अंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर त्याची ओळख पटविली असता तो कडा येथील नितीन साबळे असल्याचे समोर आले. पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता त्याचा खून झाल्याचा संशय आला. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तसेच नातेवाईकांना चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. पोलिसांनी नितीनच्या भावाला विश्वासात घेऊन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ अहमदनगर येथून तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
गुलशन शेखने दोन महिन्यांपूर्वी संतोष सकट सोबत लग्न केले होते. तिचे इतर दोघांसोबत सूत जुळले. त्यातच गुलशन शेख १५ दिवसांपूर्वीच नितीनसोबत फिरायला गेली. ही बाब इतरांना खटकली. त्यांनी नितीनला वारंवार सांगितले, मात्र त्याने ऐकले नाही. अखेर गुलशनला विश्वासात घेऊन पतीसह इतर पाच जणांनी नितीनचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. त्याप्रमाणे त्यांनी त्याला मारहाण करून ठार केले. त्यानंतर वाहनातून त्याचा मृतदेह एका विहिरीत टाकला होता. पोलिसांनी गतीने तपास करून यातील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या, इतर तिघांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
तिघांनाही तीन दिवसांची कोठडी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संतोष सकट, सोन्या ऊर्फ सागर शेख, गुलशन शेख या तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक विजय लगारे हे करीत आहेत.
अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते. तीन आरोपी अटक असून, इतर तिघांनाही लवकरच ताब्यात घेऊ. या प्रकरणात कोणाचा किती आणि काय संबंध? हे सर्व आरोपींना ताब्यात घेतल्यावरच कळेल. आमचा तपास सुरूच आहे.
- विजय लगारे, उपअधीक्षक, आष्टी