वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2023 13:45 IST2023-03-21T13:43:55+5:302023-03-21T13:45:33+5:30
बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला.

वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका
- सोमनाथ खताळ
बीड : शहरात ५०० रुपयांत देहविक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. बीड शहरातील कुंटणखान्यावरील वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात बीडच नव्हे तर परजिल्हे आणि राज्यातील मुली, महिलांनाही ओढले जात असल्याचे समोर आले आहे. महिलांची परिस्थिती पाहून त्यांना वेश्याव्यवयासाच्या घाणीत ढकलले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला. आपलाच कर्मचारी डमी ग्राहक म्हणून पाठवला आणि रविवारी रात्री या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून सहा महिलांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या महिला केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्हे आणि परराज्यातीलही असल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता सुधारगृहात पाठविले आहे. तर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे.
दरम्यान, याच भागात नेहमीच पोलिसांकडून छापे मारले जातात. यापूर्वीही येथे कारवाया झालेल्या आहेत. यातही अनेक महिलांची सुटका केलेली आहे. परंतु स्थानिक पोलिसांच्या 'अर्थ'पूर्ण दुर्लक्षामुळे हा व्यवसाय वारंवार थाटला जात आहे. हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
परराज्यातील पीडितांचे बीडमध्येच मुक्काम
परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून बीडमध्ये आणण्यात आलेले आहे. तसेच त्यांना राहण्यासाठी खोलीही करून देण्यात आलेली होती. सुटका केलेल्या सहा पीडितांमध्ये दोन अहमदनगर, १ परभणी, १ बीड आणि दोन पश्चीम बंगाल राज्यातील आहेत. तसेच येणारे ग्राहकही परजिल्ह्यातून बीडमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले. याच कारवाईत सापडलेला एक आरोपी हा मानवत (जि.परभणी) येथील आहे.
पत्र्याच्या खोलीत चालायचा व्यवसाय
हा कुंटणखाना पत्र्याच्या खोलीत सुरू होता. प्रत्येक खोलीत गादी आणि इतर साहित्य होते. ग्राहकांनी थेट येथे जाऊन महिला पाहून पैशांची बोली लावली जात असे.
पिडीत सुधारगृहात रवाना
आम्हीही ही कारवाई करण्यासाठी लोकेशन घेत होतो. परंतु पथकाला त्याची माहिती मिळाली आणि कारवाई झाली. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे. तर यातील पीडित सहाही महिलांना सुधारगृहात पाठविले आहे. त्या वेगवेगळ्या राज्यातील, जिल्ह्यातील असल्याचे सांगत आहेत.
- केतन राठोड, पोलिस निरीक्षक शिवाजीनगर