गेवराईच्या शासकीय रुग्णालयास महिलांचे प्राधान्य; महिनाभरात झाल्या १३९ नैसर्गिक प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 07:31 PM2018-01-03T19:31:34+5:302018-01-03T19:32:00+5:30
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.
गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.
येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे आणि सहकारी डॉक्टर चांगली उपचारसेवा देत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे महिल रुग्णांना व्यवस्थित व योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत आहेत. हर्निया, गर्भाशयाची पिशवी काढणे, बिनटाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियाही करण्याची सुविधा असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजय पंडित, डॉ.गोपाल रांदड, डॉ.एम.ए.रऊफ, डॉ. सराफसह कर्मचार्यांच्या परिश्रमामुळे महिलांच्या प्रसूती काळजीपूर्वक होत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे सदैव तत्पर असल्याने गरोदर मातांनी शासकीय उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत, खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उपजिल्हा रूग्णालयात महिलांना प्रसुतीनंतर दोन वेळा, जेवण, अल्पोपाहार व चहाची सोय असून दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना प्रसुतीनंतर ६०० रुपयांचा धनादेश शासनातर्फे देण्यात येतो. सेवेसोबत रुग्णांचा विश्वास संपादित करीत असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले.
एकही बालमृत्यू नाही
जिल्ह्यात एकमेव पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. जिल्ह्यातील ६ माता मृत्यूपैकी १ गेवराई तालुक्यात झाला आहे. एकही बालमृत्यू झालेला नाही.
- डॉ.राजेंद्र शिंदे, प्र. वैद्यकीय अधीक्षक, गेवराई