ढगाळ वातावरणामुळे उसावर लोकरी माव्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:09 AM2020-01-05T00:09:56+5:302020-01-05T00:10:25+5:30
गेवराई : तालुक्यात नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात उसावर लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ...
गेवराई : तालुक्यात नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यात उसावर लोकरी मावा या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ते ३५ सेल्सिअस तापमान, ८० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता अशा वेळी होतो आणि सध्या उसावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नियंत्रणाचे उपाय कीडग्रस्त भागात उसाची पट्टा अथवा रु ंद सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे प्रादुर्भावानंतर नियंत्रणाचे उपाययोजने सोयीचे होईल.
कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये बेणे निवडून झाल्यानंतर उसाची पाने जाळून टाकावीत. रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा नत्रयुक्त खताचा वापर जास्त केल्यास किडीच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. मावाग्रस्त उसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात अथवा एका भागातून दुसºया भागात घेऊन जाऊ नये. प्रादुर्भाव जास्त झाल्यास कीड नियंत्रण त्वरीत होत नाही.
रासायनिक उपाय सहा महिन्यांपर्यंत उसाला फोरेट १० जी दाणेदार १५ किलो प्रति हेक्टर तर सहा ते नऊ महिन्यापर्यंत उसाला २० किलो प्रती हेक्टर शेतामध्ये सम प्रमाणात पसरविणे. पहिल्या फवारणीनंतर एका महिन्याने किंवा जास्तीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमिथोइट ३० टक्के प्रवाही क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही ६०० ते १५०० मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोठ्या उसात गटूर किंवा पावर पंप वापरून फवारणी करताना कीटकनाशकांचे द्रावण जास्त दाबाने फवारल्यास कीड त्वरित मरते. पावर पंपाने फवारणी करताना पाणी कमी वापरावे. द्रावणास चिकटपणा येण्यासाठी स्टिकर १ मिली प्रति लिटर पाणी मिळवावे, असे आवाहन विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र खामगाव डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांनी केले आहे. ऊस पिकावर अशाप्रकारे कीड आढळून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मित्रकीटक उसात सोडावेत
जैविक पद्धत या किडीच्या नियंत्रणासाठी क्रायसोपरला कारनिया हा परभक्षक मित्रकिटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो. क्रायसोपरला कारनिया किटकाची एकरी २५०० अंडी किंवा अळ्या सोडाव्यात. उसात किडींचा खूप प्रादुर्भाव असल्यास अगोदर कीटकनाशकांच्या साह्याने किडीची संख्या कमी करावी व त्यानंतर १५ दिवसांनी परभक्षी कीटक सोडावेत. परभक्षी किटकांच्या अळ्या किडीस नष्ट करतात आणि प्रादुर्भावग्रस्त उसात फक्त परभक्षक सोडल्यास कीड नियंत्रण त्वरित होते. किडीचा प्रादुर्भाव झाल्यास लवकरात लवकर परभक्षक सोडाव्यात, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना केले जात आहे.