कोरोनातील काम कौतुकास्पद, फक्त सातत्य ठेवा - फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:29+5:302020-12-31T04:32:29+5:30
बीड : कोरोनासारख्या कठीण प्रसंगात आशांपासून ते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच केलेले काम कौतुकास पात्र आहे. आता या कामात ...
बीड : कोरोनासारख्या कठीण प्रसंगात आशांपासून ते तालुका आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच केलेले काम कौतुकास पात्र आहे. आता या कामात सातत्य ठेवून सामान्यांना आणखी चांगली रुग्णसेवा द्या, कोरोनात कुटुंबकल्याण व इतर थांबलेली कामे वाढवा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी केल्या. प्रत्येक तालुका व आरोग्य केंद्रनिहाय त्यांनी आढावा घेतल्यानंतर ही माहिती दिली.
जिल्हा आरोग्य विभाग मागील वर्षभरापासून कोरोनाविरोधात लढा देत आहे. सर्वेक्षण, तपासणी, नोंदणी आदी कामांमुळे इतर योजना, लसीकरण, कुटुंबकल्याण, मातृवंदना, मातृत्व योजना आदींकडे दुर्लक्ष झाले होते. तसेच जिल्हास्तरावरूनही सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून ऑनलाईन बैठक घेतली जात होती. परंतु, ती प्राॅपर होत नव्हती. आता कोरोनाचे रुग्ण कमी होताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व तालुक्यांचा पूर्ण एक दिवस देऊन आढावा घेतला. बीड तालुक्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत केजमध्ये थोडे कमी असल्याचे निदर्शनास आल्याचे डॉ. पवार म्हणाले. परंतु, यात लवकरच सुधारणा झालेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धारूर, वडवणी तालुक्यात कुटुंब नियोजनात सर्वात पुढे असल्याचे दिसते. जवळपास आठ महिन्यानंतर अशी एकत्रित आढावा बैठक झाली. त्यामुळे योजना, खर्च आदींचा मुद्देनिहाय आढावा घेण्यात आला. डॉ. पवार यांच्यासह माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष गुंजकर, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी हा आढावा घेतला.
सीएचओंकडून अपेक्षा वाढल्या
आता जिल्ह्यातील २४२ आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नियुक्त केले आहेत. या आढावा बैठकीला त्यांनाही बोलावण्यात आले होते. योजना, कार्यक्रम, लसीकरण, जबाबदारी आदींची माहिती त्यांना देण्यात आली. आता त्यांच्याकडून आरोग्य विभागाला चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचे डॉ.पवार यांनी सांगत त्यांना रुग्णसेवेसाठी प्रोत्साहन दिले.