माजी सैनिकांसाठीचे काम, क्षयरोग निर्मूलनात बीड जिल्ह्याचे प्रयत्न कौतुकास्पद: राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 07:22 PM2022-08-19T19:22:32+5:302022-08-19T19:23:21+5:30
जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली.
अंबाजोगाई (बीड) : जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रसंगी ते बोलत होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले. राज्यपाल कोश्यारी यांना पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आले. त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात विविध नवीन संकल्पनातून योजनांबद्ध अंमलबजावणी केली जात आहेत, असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी शर्मा यांनी माजी सैनिकांसाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे सद्यस्थितीत गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही. परंतु, माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे सांगितले.
राज्यपालांनी जिल्ह्याच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती घेतली जाणून घेतली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली. ग्रामीण भागात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जिल्हा रुग्णालय, लोखंडी सावरगाव येथील भव्य 1000 घाटांचे रुग्णालय आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बीड तसेच शेजारील जिल्ह्यातील जनतेला देखील आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात चांगले काम होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील घरोघरी सर्व्हे बरोबरच शिबिरं देखील आयोजित करण्यात आली आहेत. याप्रसंगी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या कामांबद्दल राज्यपाल महोदय यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
बैठकीस अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार अंबाजोगाई बिपीन पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय देशपांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे उपस्थित होते.