खासबाग ते मोमीनपुरा बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:50+5:302021-02-10T04:34:50+5:30
बीड : खासबाग ते मोमीनपुरा बंधारा कम पुलाच्या कामासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी आ. संदीप क्षीरसागर यांनी औरंगाबादेत जलसंपदामंत्री जयंत ...
बीड : खासबाग ते मोमीनपुरा बंधारा कम पुलाच्या कामासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी आ. संदीप क्षीरसागर यांनी औरंगाबादेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कामाला गती देण्याबाबत विनंती केली. पाटील यांनी तात्काळ कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विभाग यांना प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याने सदरील कामाला लवकरच सुरुवात होईल. या कामाबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाल्याने खासबाग ते मोमीनपुरा बंधारा कम पुलाची प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
बीड शहरातील खासबाग ते मोमीनपुरा या भागाला जोडला जाणारा बंधारा कम पूल लवकर व्हावा, यासाठी या भागातील नागरिक सातत्याने आ. संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा करायचे, त्याचबरोबर या पुलाबाबत आ. क्षीरसागर यांनीही अनेक वेळा संबंधित मंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली. आ. क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे सदरच्या कामाला मान्यता मिळाली होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव प्रशासकीय पातळीवर या कामाची गती मध्यंतरी मंदावली होती. ९ रोजी जयंत पाटील यांची औरंगाबादेत भेट घेऊन खासबाग ते मोमीनुपरा या भागाला जोडला जाणारा बिंदुसरा नदीवरील बंधारा कम पुलाच्या कामाबाबत गती देण्याची विनंती यावेळी आ. क्षीरसागर यांनी केली. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासबाग ते मोमीनपुरा या भागाची ही महत्त्वाची मागणी पूर्णत्वाकडे जात असून बिंदुसरा नदीपात्रावर बंधारा कम पूल लवकरच होणार असल्याचे दिसत आहे.