मांजरसुभा-केज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:24+5:302021-07-10T04:23:24+5:30
विशाल शिंदे नेकनुर : मागील ५ वर्षांपासून मांजरसुभा ते केज राष्ट्रीय महामार्गाचे काम अगदी कासवगतीने व मनमानी पद्धतीने चालू ...
विशाल शिंदे
नेकनुर : मागील ५ वर्षांपासून मांजरसुभा ते केज राष्ट्रीय महामार्गाचे काम अगदी कासवगतीने व मनमानी पद्धतीने चालू आहे. या महामार्गावर जागोजागी अर्धवट स्वरूपात काम केले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना या कामाचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर कित्येक जण अपंग झाले आहेत.
या कंत्राटदाराचा एवढा हलगर्जीपणा आहे की, या महामार्गावर काम करत असताना कसल्याही प्रकारचे बोर्ड, सूचना फलक न लावल्यामुळे लोकांना खूप अडचणीचे झाले आहे. रात्रीच्या वेळेस या महामार्गावर वाहन चालवताना खूप त्रास होत आहे. लोक जीव मुठीत घेऊन या रस्त्याने वाहने चालवत आहेत. या रस्त्याने जायचे म्हणजे राम भरोसे म्हणावे लागेल.
नेकनुरमधील मार्केटमध्ये गेल्या एक वर्षापासून उकरून ठेवलेले रस्ते अद्यापी अर्धवटच आहेत. ही अपूर्ण कामे स्थानिक लोकांना खूप धोक्याची व त्रासदायक ठरत आहेत. अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे गांभीर्य बाळगत नाहीत. हे काम पूर्ण करण्यास तयार होत नाहीत. पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आहे, तरी पुलांचे काम अद्याप अपूर्ण आहे. पाऊस पडल्यानंतर अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे लोकांना घसरून पडण्याची, गाडी स्लीप होण्याची शक्यता जास्त असते. या त्रासाला कंटाळून लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
हा महामार्ग करत असताना रोडलगत असलेली हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. या कंत्राटदाराने रोडच्या कडेने झाडे लावली, पण ती किती जगवली, हा प्रश्न आहे. एकही झाड जगले नाही. पाणी नाही दिले, म्हणून झाडे वाळून जळून गेली. या कामामध्ये प्रशासनाने लक्ष घालून केलेल्या कामाची तसेच लावलेल्या झाडांची चौकशी करावी, अशी मागणी लोकांमधून होत आहे.
हे काम करणे खूप महत्त्वाचे बनले आहे, कारण की, या अर्धवट केलेल्या रोडमुळे लोकांचे जीव जात आहेत. अर्धवट कामामुळे हा रोड धोकादायक बनला आहे. या कंत्राटदारांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये. लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून घ्यावा.
- अरविंद जाधव, (सामाजिक कार्यकर्ते, नेकनुर)
090721\09_2_bed_8_09072021_14.jpeg~090721\09_2_bed_6_09072021_14.jpeg
नेकनूर ~नेकनूर रस्ता .