बीड शहरातील नव्या पुलाचे काम आजपासूनच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 AM2017-12-15T00:46:09+5:302017-12-15T00:46:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम तातडीने शुक्रवार (दि. १५) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील पुलाचे काम तातडीने शुक्रवार (दि. १५) पासून सुरु होणार आहे. गुरुवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकाºयांची तातडीने नागपूर येथे बैठक घेतली. आय.आर.बी. करत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २११ च्या कामांतर्गत स्कोप आॅफ चेंज वर्क या हेडखाली हे काम होणार आहे. अस्तित्वात असलेला पूल पाडण्याचे काम १५ ते २० दिवसात करुन पावसाळयापूर्वीच नव्या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. क्षीरसागरांनी दिल्यामुळे या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वरील बीड बायपास १२ किलोमीटरला सर्व्हिस व स्लीप रोड करुन परळी - बीड - नगर रस्त्यावर पांगरबावडी, इमामपूर या ठिकाणी भुयारी पूल व रस्ता करण्याचा निर्णय झाला आहे. कुर्ला रोडवरील नागरिकांसाठी सर्व्हिस व स्लीपरोड करण्याची सूचनाही आ. क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालकांना दिली होती. त्याच वेळी बार्शी नाका येथील बिंदूसरा नदीवरील ८० वर्षांपूर्वीचा पूल त्याच ठिकाणी १६२ मीटर लांबीचा नवीन पूल करण्याचा प्रस्ताव २०१६ मध्येच दाखल केला होता.
केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा पूल स्कोप आॅफ चेंज वर्क या नियमानुसार नवीन टेंडर न काढता कमी कालावधीत करता येतो हे आ. क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले होते.
त्यानंतर गडकरी यांनी पुलाच्या बांधकामाबाबत सूचना देऊन तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक चामलगोरे, घोटकर, आय.आर.बी.कंपनीचे प्रकल्प संचालक आर.एन.चौरे, धनराज केपरीट, कार्यकारी अभियंता दंडे राष्ट्रीय महामार्ग यांच्याबरोबर बैठका घेऊन पुलाच्या कामाला गती देण्यात आली.
अधिका-यांच्या बैठकांवर बैठका
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत अधिकाºयांच्या साधारण ६ ते ७ बैठका घेत अखेर या पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे, आ. जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. शुक्रवारपासून मुख्य संचालक एस. चंद्रशेखर व अधिकाºयांच्या उपस्थितीत जुना पूल पाडण्याचे काम सुरू होणार आहे.