निधीअभावी आष्टी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:17+5:302021-01-25T04:34:17+5:30

आष्टी : शहरात मागील वर्षी जानेवारीत अंदाजे दोन कोटी रुपये खर्चातून बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली ...

Work on the new building of Ashti bus stand stalled due to lack of funds | निधीअभावी आष्टी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम रखडले

निधीअभावी आष्टी बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम रखडले

Next

आष्टी

: शहरात मागील वर्षी जानेवारीत अंदाजे दोन कोटी रुपये खर्चातून बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. बांधकाम सुरू झाल्यानंतर ते फाऊंडेशन लेव्हलपर्यंत आले आहे. झालेल्या कामाचे संबंधित गुत्तेदाराला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने पैसे न दिल्याने काम बंद ठेवले आहे. गुत्तेदाराचे २१ लाख रुपये थकीत असल्याने दहा महिन्यांपासून नवीन बसस्थानक इमारतीचे काम बंद असल्याचे सांगण्यात येते.

आष्टी शहराला मराठवाड्याचे प्रवेशद्वार संबोधले जाते. येथील बसस्थानकातून दररोज शेकडो बस आणि हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या बसेस सुटतात. बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे कामदेखील सुरू झाले. पायाभरणी होऊन काॅलम टाकण्याच्या प्रक्रियेपर्यंत हे काम येऊन पोहोचले. दरम्यान, कोरोना आपत्तीमुळे इमारतीचे पुढचे काम बंद झाले. लाॅकडाऊनमधून काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानंतर बसस्थानकाच्या इमारतीचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु हे काम अद्यापपर्यंत बंद आहे. लाॅकडाऊनमुळे काही काळ एस. टी. महामंडळाने सर्व बसेस बंद ठेवल्या होत्या. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागल्याने मंडळाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कामासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे

गेल्या दहा महिन्यांपासून आष्टी येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम बंद आहे. या कामासाठी खासदार, आमदार आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.

परिसरात घाणीचे साम्राज्य

नवीन बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील प्रवासी आणि व्यापाऱ्यांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरात घाणीचे साम्राज्य

निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी परिसरात स्वच्छता करून घ्यावी.

- अविनाश जगताप, संभाजी ब्रिगेड, आष्टी तालुकाध्यक्ष

महामंडळाकडे निधीच नाही

कोरोनामुळे पाच-सहा महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्वच बससेवा बंद होत्या. त्यामुळे मंडळाचे उत्पन्न पूर्णपणे बंद होते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागले. काही महिन्यांपासून बससेवा सुरू झाली असली तरी प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातच डिझेलचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मंडळाकडे नवीन काम पूर्ण करण्यासाठी सध्या पुरेसा निधी नाही.

अनिल माने, प्रभारी विभागीय अभियंता, परिवहन विभाग, बीड

Web Title: Work on the new building of Ashti bus stand stalled due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.