पंचायत राजच्या स्वागताला, झाडू लागला कामाला; शिरूर तालुक्यात समितीचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 07:12 PM2017-12-29T19:12:29+5:302017-12-29T19:14:21+5:30
संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
शिरुर कासार (बीड) : संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित्र दिसत असून, पंचायतराजच्या परिक्षेत जास्तीत जास्त गुणांकन मिळण्यासाठी प्रयत्न होत असून, किमान प्रथम श्रेणीत आलो नाही तरी चालेल पण लालशेरा पडता कामा नये याची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसत आहे.
पंचायत राज समितीत मान्यवरांचा समावेश असतो. त्यांचे अधिकार कक्ष देखील व्यापक स्वरुपाचे असतात याची जाणीव ठेवून कार्यालयात समितीला अपेक्षित असलेले बदल दृष्टिक्षेपात आणण्याचा कसोशिने प्रयत्न केला जात आहे. देशाचा पंतप्रधान जर हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देत असेल तर त्याचा सन्मान म्हणून आता आपण सुद्धा हातात झाडू घेताना कमीपणा वाटून घेऊ नये असे म्हणत कार्यालयीन प्रमुख स्वच्छतेच्या कामात पुढाकार घेताना दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तहसील कार्यालयातही स्वच्छता मोहिमेचा हातात झाडू घेऊन प्रारंभ केला. त्यावेळी सर्व कर्मचारी देखील आपापला कक्ष स्वच्छ करीत होते.जिल्हाधिकारी यांनी भेटीत अधिकार्यांची केलेली कानउघडणी सर्वत्र चर्चिली गेली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयातदेखील पिचकार्यांनी रंगलेले कोपरे तर स्वच्छ केलेच परंतु कागदपत्राच्या सालवाईज, विषयानुसार अत्यंत व्यवस्थितपणे ठेवण्यात आल्या. आता तर पंचायत राज समिती येणार म्हटल्यावर गावपातळीवरचे छोटे कार्यालय देखील न जाणो हा दौरा आपल्या भेटीला आलाच तर ! अशी शक्यता नाकारता येत नसल्याने वरच्या स्वच्छतेबरोबर कागदी कारभार सुद्धा देखणा करण्यात सर्वजण गुंतले आहेत.
कचरा बाहेर, तर कागदपत्राच्या फाईलही दिसू लागल्या टकाटक
दवाखाने, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाड्या, बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाने आदी कार्यालयात सध्या पंचायत राज समिती दौर्याची व त्यांच्या स्वागतासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु असल्याने स्वच्छतेचे वारे चांगलेच सुखावून टाकत आहे.
पंचायतराज समितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या या कामात कायम स्वरुपी सातत्य व नियमितता ठेवल्यास इतकी धावपळ करण्याची गरजच असणार नसल्याचे बोलले जाते. पंचायतराज समितीच्या या दौर्यामुळे का होईना सध्या झाडूला चांगले काम लागले आणि कार्यालयाचा चेहरामोहरा टवटवीत दिसू लागला आहे हे ही नसे थोडके.