coronavirus : अंबाजोगाईतील प्रयोगशाळेच्या कामाची गती संथ; मंजुरी मिळून महिन्यानंतरही कार्यान्वित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:53 PM2020-05-20T18:53:44+5:302020-05-20T18:54:19+5:30
अंबाजोगाईची प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोना संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर ते जिल्ह्यातच तपासता यावेत, यासाठी अंबाजोगाई येथे प्रयोगशाळा मंजूर झाली. परंतु महिना उलटूनही अद्याप ही प्रयोगशाळा तयार झालेली नाही. त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूरच्या प्रयोगशाळेत स्वॅबची संख्या वाढल्याने अहवाल येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे अंबाजोगाईची प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे.
शासनाने राज्यात सहा ठिकाणी कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळांना मंजूरी दिली. यात बीडमधील अंबाजोगाईचा देखील समावेश होता. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता साधारण महिनाभरात प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असे अश्वासन देण्यात आले होते. परंतु महिना उलटल्यानंतरही या प्रयोगशाळेचे काम अर्धेच झालेले आहे. यावरून हे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यासाठी नियोजनमधून अडीच कोटींचा निधीही देण्यात आलेला आहे.
दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविले जात आहेत. याच प्रयोगाळेत लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातूनही स्वॅब तपासणीस येतात. सुरूवातील रुग्ण कमी असल्याने ताण कमी होता. परंतु आता तीनही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संपर्कातील आणि बाहेरून आलेल्या लोकांचे स्वॅब घेतले जात आहेत. ही संख्या दररोज ३०० पेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे प्रयोगशाळेवर ताण येत असून अहवाल प्राप्त होण्यास उशिर होत आहे. इकडे अहवालांची प्रतिक्षा करून नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे ही प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही स्वाराती रुग्णालयास भेट दिली होती.
२४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमता
लातूरच्या प्रयोगशाळेत २४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. परंतु संख्या वाढल्याने येथील अधिकारी, कर्मचारी जादा वेळ घेत आलेला प्रत्येक स्वॅब तपासत आहेत. मंगळवारी १८२ स्वॅबची तपासणी केली होती. त्यामुळे अहवाल येण्यास मध्यरात्र झाली होती. बुधवारी तर बीडमधूनच ११४ स्वॅब गेले होते. लातूर आणि उस्मानाबादचाही आकडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्वॅब तपासण्यास वेळ लागत आहे.
नमीता मुंदडांचे वैद्यकीय मंत्र्यांना पत्र
स्वॅबची संख्या वाढल्याने लातूरच्या प्रयोगशाळेवर ताण येत आहे. अहवाल येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करावी. त्यामुळे वेळेत अहवाल मिळून रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे पत्र केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी, अधिष्ठातांचा प्रतिसाद नाही
या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी तो घेतला नाही. तर स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांनी भ्रमणध्वणी कट केला. त्या दोघांकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची बाजू समजली नाही.
प्रयोगशाळेत २४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. आलेले स्वॅब दररोज तपासले जातात.
- डॉ.वियकुमार चिंचालीकर, प्रमुख, कोरोना विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, लातूर