काम दोन महिने अन् वेतन केवळ सात दिवसांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:45+5:302021-08-21T04:37:45+5:30
योद्धांची चेष्टा : जीव धोक्यात घालून काम करूनही हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ बीड : कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम ...
योद्धांची चेष्टा : जीव धोक्यात घालून काम करूनही हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ
बीड : कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून काम करूनही कंत्राटी कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन देण्यास आरोग्य विभाग टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी केवळ सातच दिवसांचे वेतन अदा करण्यात आले आहे. यावरून कोरोनायोद्धांची क्रूर चेष्टा केल्याचे दिसत आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत तर आतापर्यंत ८१ हजार रुग्ण सापडले. एप्रिल ते जुलै महिन्यांत जिल्ह्यातील आरोग्य संस्थाही कोरोनाबाधित व संशयितांवर उपचार करण्यास कमी पडत होत्या. त्यामुळे मनुष्यबळाचाही तुटवडा जाणवला. याच अनुषंगाने तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय ते डॉक्टर अशी विविध पदे भरण्यात आली. या लोकांनी कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून रुग्णांचे शुश्रूषासह उपचार केले. त्यांना कोरोनायोद्धा म्हणून मान दिला. परंतु, याच कर्मचाऱ्यांना आता हक्काचे वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन महिन्यांचे वेतन थकलेले असताना केवळ सात दिवसांचे देण्यात आलेले आहे. त्यामुळे कर्मचारी वैतागले असून अधिकारी व आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वेतन द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन
जीव धोक्यात घालून काम करूनही हक्काचे वेतन दिले जात नसल्याने कर्मचारी चांगलेच वैतागले आहेत. आठवडाभरात वेतन न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दुर्दैवाने असे झाले तर अधिकाऱ्यांना हे प्रकरण चांगलेच अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हळूहूळू सर्वांचे वेतन दिले जात आहे. राहिलेले वेतनही आठवडाभरात देण्याचा प्रयत्न करू. डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक बीड