तलाठी कार्यालयात खासगी व्यक्तीमार्फत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:44+5:302021-02-20T05:35:44+5:30
आष्टी : तालुक्यातील विविध सजांच्या तलाठी कार्यालयांमध्ये खासगी व्यक्तिंमार्फत कामकाज चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, तलाठी कार्यालयामध्ये शासन ...
आष्टी : तालुक्यातील विविध सजांच्या तलाठी कार्यालयांमध्ये खासगी व्यक्तिंमार्फत कामकाज चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, तलाठी कार्यालयामध्ये शासन निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे निवेदन डॉ. राजेंद्र जरांगे यांनी तहसीलदारांना दिले आहे.
खासगी व्यक्तिंमार्फत काम करणाऱ्या तलाठ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत शासनाच्या महसूल व वन विभागाने आदेश दिले आहेत, त्या अनुषंगाने कारवाई करावी. तलाठी कार्यालयामध्ये सर्व माहिती व सूचना कार्यालयाच्या आवारात लावाव्यात, योग्य शुल्क आकारणी करावी, तलाठ्यांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या सूचना फलकावर लिहाव्यात तर त्यांचा नियोजित दौरा व बैठका याबाबतची माहितीही कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे. तसेच तलाठी कार्यालयामध्ये मंडल अधिकारी व नायब तहसीलदारांचा मोबाईल नंबर सूचना फलकावर लिहिण्यात यावा. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी तलाठ्यांकडून होते की नाही, याची अचानक तपासणी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. जरांगे यांनी केली आहे.