जागतिक चिमणी दिवस : अंगणात, घरात, जेवणाच्या ताटाजवळ दिसणारी चिऊताई गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:13 PM2020-03-20T14:13:36+5:302020-03-20T14:23:11+5:30
२० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) म्हणून साजरा केला जातो.
बीड : एरव्ही अंगणात, घरात आणि अनेकदा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणाऱ्या चिऊताईचे आता दर्शन होणेही मुश्किल बनले आहे. शहरांतील वाढती सिमेंटची जंगले आणि ग्रामीण भागात होणारी अवैध वृक्षतोड यामुळे चिऊताई दिसेना झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे. चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
२० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) म्हणून साजरा केला जातो. कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊतार्इंच्या आठवणींशी जोडले गेले आहे. अनेकांचे जेवण चिऊतार्इंच्या घासानेच सुरू झाले. दोन पायावर टुणूटुणू उड्या मारणारी चिमणी, तिचा चिवचिवाट, एवढ्याशा पाण्यात स्नान करताना त्यांचा असलेला उत्साह आता दुर्मिळ होत चालला आहे. अलीकडील वाढते शहरीकरण, प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर, मोबाईल टॉवर्स, घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता चिमण्यांची संख्या कमी करीत आहे. एका सर्वेक्षणानुसार चिमण्यांची संख्या ६० ते ८० टक्के कमी झाली आहे. यामुळे अन्नसाखळी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सतत आपल्याभोवती वावरणारी चिमणी दिसेनाशी झाली आहे. याच कारणामुळे चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या संख्येबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून २० मार्च हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे पक्षीमित्र प्रा.जगदिश करपे यांनी सांगितले.
दरम्यान, घर चिमणी व रानचिमणी (पितकंठी) असे महाराष्ट्रातील चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. जगात चिमण्यांचे २८, भारतात सहा प्रकार असून जगात चिमणीसदृश ४३ पक्षी आढळतात. ही चिमणी चिमणी शिळेपाके अन्न, धान्य, कोळी, कीटक, नाकतोडे असे अन्न खाते. तसेच ती वर्षातून चार वेळा अंडी देते.
चिमणी वाचविण्यासाठी हे करा
चिमणी वाचविण्यासाठी घराजवळ, गच्चीवर धान्य, पाणी ठेवणे, अडगळीची जागा निर्माण करणे, खोपे तयार करून ठेवणे (पाईपचा वापर करून), कीटकनाशकांचा प्रमाणात वापर करणे. शिकार न करणे, यामुळे चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकून आजची मुले आणखी निसर्गाजवळ जातील, त्यांचा ताण नक्कीच कमी होईल, असा विश्वासही प्रा.करपे यांनी व्यक्त केला.
माणसांवर प्रेम करणारी चिमणीच
छोटा आकार, गब्दुल बांधा, आखुड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय, पण भक्कम कोणाकृती चोच ही चिमणीच ओळख आहे. देशात चिमणीचे सर्वत्रच वास्तव्य आहे. शहरात, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी, प्रदेशात अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवले आहे. पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रीय असल्याचे दिसते. माणसांवर प्रेम करणारे माणसाव्यतिरिक्त कोणी असेल तर ती चिमणी असते, असे पक्षीप्रेमींचे मत आहे.