चिंताजनक; २४ तासांत ९ कोरोना बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:15+5:302021-04-01T04:34:15+5:30
बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत तब्बल ९ जणांचा कोरोनाने जीव घेतला. तसेच बुधवारी ३२५ नवे रुग्ण आढळून आले ...
बीड : जिल्ह्यात मागील २४ तासांत तब्बल ९ जणांचा कोरोनाने जीव घेतला. तसेच बुधवारी ३२५ नवे रुग्ण आढळून आले तर २२३ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली. बुधवारच्या मृत्यूवरून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात बुधवारी २ हजार २२३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३२५ नवे रुग्ण आढळून आले तर १ हजार ९०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ५०, आष्टी तालुक्यातील ३४, बीड तालुक्यातील ९८, धारुर तालुक्यातील ०४, गेवराई तालुक्यातील २१, केज तालुक्यातील २१, माजलगाव तालुक्यातील २०, परळी तालुक्यातील ४१, पाटोदा तालुक्याातील २४, शिरुर तालुक्यातील ०८ तर वडवणी तालुक्यातील ०५ जणांचा समावेश आहे.
दरम्यान,बुधवारी ०९ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यामध्ये गेवराईच्या पोलीस वसाहतीमधील ६० वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील सोनीजवळा येथील ४२ वर्षीय पुरुष, माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील ६० वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील सेलूअंबा येथील ४४ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील दैठणा येथील ६० वर्षीय पुरुष, पाटोदा तालुक्यातील जन्मेवाडी येथील ६५ वर्षीय महिला, बीड तालुक्यातील राजुरी येथील ८० वर्षीय महिला, बीड शहरातील पालवण चौक परिसरातील ८५ वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील बनसारोळा येथील ४० वर्षीय पुरुष यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५ हजार ५०४ इतकी झाली आहे. पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २३ हजार १२९ इतकी आहे तर ६३५ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.