चिंताजनक ! बीडमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; नवीन सहा रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 09:38 PM2020-06-08T21:38:44+5:302020-06-08T21:40:13+5:30
यापूर्वी आष्टी तालुक्यातीलच सांगवी पाटण येथे आलेले परंतू मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षीच वृद्धेचा मृत्यू झाला होता.
बीड : मुंबईन आलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेतला. त्यात दोन्ही वेळा त्याचा अहवाल इनकनक्लूझिव्ह आला. रविवारी रात्री तिस-यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला होता. याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. सोमवारी आणखी नव्याने सहा रुग्णांची वाढ झाली आहे.
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एक कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून गावी आले होते. याच कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा रुग्णालयात आणून स्वॅब घेतला. पत्नी दोन मुले व मयत व्यक्ती यांचा स्वॅब घेतला. या तिघांचेही स्वॅब निगेटिव्ह आले तर पुरूषाचा इनकनक्लूझिव्ह आला होता. पुन्हा ४८ तासांनी स्वॅब घेतला. त्याचा अहवाल देखील इनकनक्लूझिव्ह आला. रविवारी रात्रीही स्वॅब घेतला. परंतू पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला. यात तो पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी आष्टी तालुक्यातीलच सांगवी पाटण येथे आलेले परंतू मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षीच वृद्धेचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातून २२ स्वॅब घेण्यात आले होते. यात ६ रुग्ण नवीन आढळले आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील इतर तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. हे बीड शहरातील मसरत नगर भागातील आहेत. तसेच धारूर तालुक्यातील आंबेवडगाव, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रूक व आष्टी तालुक्यातील मातावळी येथील आहेत. यातील मातावळीचा रुग्ण मयत झालेला आहे.