पोलीस ठाण्यातील बेवारस दुचाकी भंगारमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:42+5:302021-04-09T04:35:42+5:30
बीड : विविध पोलीस ठाण्यांमध्ये धूळखात उभ्या असलेल्या दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने या बेवारस दुचाकी अखेर भंगारमध्ये ...
बीड : विविध पोलीस ठाण्यांमध्ये धूळखात उभ्या असलेल्या दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने या बेवारस दुचाकी अखेर भंगारमध्ये जाणार आहेत. पोलीस ठाण्यांनी लिलाव प्रक्रिया राबवून दुचाकींच्या ‘स्क्रॅप’ची तयारी केली आहे. तब्बल शंभर दुचाकी यातून भंगारात जाणार असल्याची माहिती आहे.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १२ दुचाकी बेवारस आहेत. मूळ मालकांची ओळख न पटल्याने ही वाहने स्क्रॅप केली जाणार आहेत. स्क्रॅप करतानाच खरेदीदार व्यावसायिकाला हे वाहन पुन्हा रस्त्यावर दिसणार नाही, अशी तंबी दिली जाणार आहे. दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यात लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील, ए. एम. शेख यांनी दिली. बीड शहर ठाण्यात ३२ दुचाकी बेवारस असून, १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता लिलाव प्रक्रिया होणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक घनश्याम अंतरप यांनी दिली. पेठ बीड पोलीस ठाण्यात चार दुचाकी बेवारस आहेत. ९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता त्यांचा लिलाव होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.