कुस्ती गरिबाचा खेळ, कोरोनाने तुपावरचा पहिलवान तेलावर आणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:12+5:302021-01-15T04:28:12+5:30
कुस्तीपट्टू राहुल आवारे : बीडमध्ये भरपूर खेळाडू; पण प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत बीड : कुस्ती हा श्रीमंतांचा खेळ मुळीच ...
कुस्तीपट्टू राहुल आवारे : बीडमध्ये भरपूर खेळाडू; पण प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत
बीड : कुस्ती हा श्रीमंतांचा खेळ मुळीच नाही. हा गरिबांचा खेळ असून, खूप घाम गाळून अंगाला माती लावून घ्यावी लागते. अगोदरच कुस्तीला कोणी प्रोत्साहन देत नाही. त्यात कोरोनाने तर तुपावरचा पहिलवान थेट तेलावरच आणला आहे. बीड जिल्ह्यात कुस्ती खेळणारे भरपूर जिद्दी खेळाडू आहेत; परंतु त्यांना प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे यांनी व्यक्त केली.
राहुल आवारे हे बीडचे भूमिपुत्र. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या राहुल यांनी लाल मातीत कुस्ती खेळून अनेक फड गाजविले. सुरुवातीला मातीत खेळणारा हा पहिलवान नंतर मॅटवर खेळू लागला. सुरुवातीला राज्य, नंतर राष्ट्रीय आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळून तो राज्याचेच नव्हे, तर देशाचे नाव उंचावत आहे. याच कुस्तीने त्यांना पोलीस उपअधीक्षक हे पद मिळवून दिले आहे. सध्या ते पुणे ग्रामीणला कर्तव्य बजावत आहेत. गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक पैलू उलगडून सांगितले. सुरुवातीला जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी त्यांचे स्वागत केले.
बीड जिल्ह्यात कुस्ती खेळणारे खूप खेळाडू आहेत; परंतु त्यांना पाहिजे तेवढे प्रोत्साहन कोणीच देत नाही. संघटनांचे पदाधिकारी केवळ मिरवायला असतात, प्रत्यक्षात गरीब खेळाडूला कोणीच मदत करत नाहीत. बीडमधील खेळाडू हे गरीब आहेत. त्यांना मदत आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते खूप उंचीवर जातील, असा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला. यावेळी अरविंद विद्यागर यांच्यासह जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष गाेविंद चव्हाण, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी बाळासाहेब आवारे, गोकुळ आवारे, साॅफ्टबॉल संघटनेचे प्रदीप डोंगरे, धनेश करांडे, योगेश आवदाळ, रमाकांत डिंगले, ज्ञानेश्वर धंडारे, राष्ट्रीय खेळाडू सचिन जाधव आदींची उपस्थिती होती.
जत्रेमध्ये कुस्ती चालू करा
सध्या सर्वत्र जत्रा आहेत. बीडचे कुस्तीपटू सामान्य कुटुंबातील असतात. कुस्ती खेळून आलेल्या पैशांवरच ते आहार व इतर सर्व खर्च काढतात. कोरोनाने कुस्ती बंद झाली आहे. सध्या त्यांचे हाल होत आहेत. आता कोरोनाचे गांभीर्य कमी झाले असून शासनाने सर्व नियम व अटी घालून जत्रेतील कुस्तींना परवानगी देण्याची मागणी क्रीडा मार्गदर्शक बाळासाहेब आवारे यांनी केली.