बीडमध्ये खोटी फिर्याद देऊन ‘त्या’ महिलेकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:31 PM2017-12-04T23:31:51+5:302017-12-04T23:33:18+5:30
बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले असून, सदरील महिलेने पोलिसांची दिशाभूल केली आहे. यामागचे कारण पोलीस शोधत आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेतून एका महिलेजवळील काढलेले १ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली होती. ऐन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लुटीची घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली होती. हे तपास तात्काळ लावण्याचे मोठे आव्हान शिवाजीनगर पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक व शिवाजीनगर पोलिसांची विशेष पथके याकामी नेमली गेली. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता; परंतु वास्तव मात्र काही वेगळेच असल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
पैसे काढलेच नाहीत
तपास अधिकारी एस.डी. पठाण यांनी सदरील महिलेचे बँक स्टेटमेंट काढले. त्यात या महिलेने पैसेच काढले नसल्याचे समोर आले. फिर्यादीत मात्र महिलेने आपण बँकेच्या खात्यातून काढलेले पैसे लंपास केल्याचाचा स्पष्ट उल्लेख आहे. स्टेटमेंट व फिर्यादीत तफावत आढळून आल्याने हा सर्व प्रकार पोलिसांची दिशाभूल करून धावपळी करण्यासाठीच होता, असे प्रथमदर्शनी समोर आले आहे. खोटी फिर्याद देऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी सदर महिलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल केला जाईल
सदरील महिलेचे बँक स्टेटमेंट काढले असता त्यात १ लाख रुपये विथड्रॉल झालेच नाहीत. विशेष म्हणजे दिवसभर केवळ एका व्यक्तीने लाख रुपयांच्या वर रक्कम बँकेतून काढली आहे. सदरील महिलेने पोलिसांची दिशाभूल केल्याचे दिसते. त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध घेत आहोत. दिशाभूल केल्याप्रकरणी सदरील महिलेवर लोकसेवकाला खोटी माहिती देणे या आरोपाखाली कलम १८२ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल.
- एस.डी. पठाण, सहायक पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर, बीड.