दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:56+5:302021-05-19T04:34:56+5:30
बीड : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परीक्षा तर रद्द केली, मग भरलेले परीक्षा ...
बीड : कोरोना संसर्गामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. परीक्षा तर रद्द केली, मग भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणार? का? ते कधी मिळणार? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. दरम्यान, याबाबतीत परीक्षा मंडळाकडून अद्याप कसल्याही सूचना नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
मार्च २०२० मध्ये काही विषयांच्या परीक्षा होण्याआधीच कोरोना संसर्गामुळे रद्द कराव्या लागल्या, तर २०२१ मध्ये ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग झाला. मात्र विविध कारणांमुळे तसेच तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली प्रभावी ठरली नाही, तर नोव्हेंबरपासून दहावीचे वर्ग प्रत्यक्षात भरले; मात्र उपस्थिती कमीच राहिली. कोरोनामुळे शाळा भरल्या नाहीत, शिक्षणही परिपूर्ण झाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालकांनी मार्च २०२१ ची परीक्षा टाळण्याचा विचार केला. परंतु शिक्षकांनी आग्रह करून परीक्षेसाठी आवेदनपत्र भरायला लावले; तर अन्य विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षेसाठी आवेदन भरले. शाळांमार्फत प्रती विद्यार्थी ४५० रुपयांप्रमाणे आवेदनपत्रासह शुल्क भरले. हे शुल्क राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे जमा करण्यात आले. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचा मुद्रांक खर्च, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे साहित्य, पर्यवेक्षकांचे मानधन, भरारी पथकाचा खर्च करावा लागतो, यासाठी परीक्षा शुल्क घेतले जाते. परीक्षेच्या तारखा घोषित झाल्या; परंतु कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे का? असे बाेलले जाते. परीक्षा होणार नसल्याने परीक्षेसाठी घेतलेले शुल्क परत करण्याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
---------
दहावीच्या परीक्षेसाठी ४५० रुपये शुल्क भरले होते. परीक्षा होणार म्हणून तयारी केली; पण परीक्षा रद्द झाली. परीक्षा शुल्क परत मिळणार असेल, तर कधी, हे समजले नाही. मी अकरावी विज्ञानची तयारी सुरू केली आहे. - सार्थक बुंदेले, विद्यार्थी, बीड.
----------
कोरोना परिस्थितीमुळे वर्षभर दहावीच्या परीक्षेसाठी घरीच तयारी करून परीक्षा शुल्क व अर्ज भरला. परीक्षा रद्द झाल्याने भरलेले ४५० रुपये शुल्क परत मिळाल्यास मला कामी येतील. परीक्षा शुल्क लवकरात लवकर परत मिळावे. मी अकरावी सायन्ससाठी तयारी सुरू केली आहे. - भावेन भंडारी, विद्यार्थी, बीड.
------------
मी दहावीच्या परीक्षेसाठी अर्जासोबत शुल्क भरले होते. ४५० रुपये शुल्क होते. परंतु परीक्षा झाली नाही. ते पैस परत मिळाले, तर आनंद होईल. जूनपासून अकरावीची तयारी करणार आहे. शुल्क परत मिळाल्यास पुस्तके किंवा वह्या खरेदी करता येतील. - निखिल सानप, विद्यार्थी, बीड.
------
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क हा विषय शासन आणि बोर्डाचा भाग आहे. शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला, तरी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करावयाचे असेल, तर बोर्डाकडे शासनाला हा निधी भरावा लागतो. शासनाच्या निर्देशानुसार प्रतिपूर्तीबाबत कार्यवाही होईल.
-डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक बीड.
--------------
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - ५५०
दहावीतील एकूण विद्यार्थी - ४५०००
प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क - ४५०
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - २०२५००००
-------------------