यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:46+5:302021-03-16T04:32:46+5:30
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उल्हास उढाण ...
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागात नेतृत्व तयार केल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. उल्हास उढाण यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद,संचलित येथील यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,विभागीय केंद्र,औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने 'आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान' या विषयावर एकदिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे या होत्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,विभागीय केंद्र,औरंगाबादचे शैक्षणिक सल्लागार डाॅ.राम माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.राम माने यांनी केले. यावेळी डॉ.उल्हास उढाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की,यशवंतराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील लोकांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली. तसेच समाजातील सर्व स्तरांतील लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले. यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीला चालना देऊन महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजविली. त्यांनी सतत गरीब जनतेचाच विचार केला. प्राचार्य डॉ.वनमाला गुंडरे म्हणाल्या की,यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. राजकारणाबरोबरच त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ.अनंत दादाराव मरकाळे यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे,उपप्राचार्य प्रा.पी.के.जाधव, डॉ.डी.आर.तांदळे, डाॅ.डी.बी.तांदुळजेकर आदी प्राध्यापक,विद्यार्थी तसेच राज्य व राज्याच्या बाहेरील अभ्यासक सहभागी झाले होते.
===Photopath===
150321\15bed_7_15032021_14.jpg
===Caption===
अंबाजोगाईत यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते.