यंदा श्रावण २९ दिवसांचा; मंदिरात प्रवेश मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:18+5:302021-07-22T04:21:18+5:30
परळी : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर तसेच जिल्ह्यातील शिवमंदिरे श्रावणात गजबजलेली असतात. परंतु कोरोनाच्या ...
परळी : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर तसेच जिल्ह्यातील शिवमंदिरे श्रावणात गजबजलेली असतात. परंतु कोरोनाच्या संकटामुळे मार्च २०२० पासून श्री वैद्यनाथ मंदिरासह शिवमंदिरे बंद आहेत. त्याचा परिणाम आर्थिक उलाढालीवर झाला आहे. श्रावण महिना ९ ऑगस्टपासून ६ सप्टेंबरपर्यंत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल का व भाविकांना दर्शन मिळेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंदिरे बंद असल्याने परिसरातील बेल, फुल विक्रेते, खेळणी दुकाने, प्रसाद साहित्य, हॉटेल्समधील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच वैद्यनाथ मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. दर श्रावण सोमवारी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवमंदिरे बंद आहेत. वैद्यनाथांच्या स्पर्शाने सर्व रोग दूर होतात असा महिमा आहे. त्यामुळे वैद्यनाथाचे मंदिर दर्शनासाठी भाविकांकरिता उघडावे, अशी मागणी हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केली. तर भाविकांचा जास्त अंत न पाहता शासनाने मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली.
श्रावण सोमवार
पहिला - ९ ऑगस्ट
दुसरा - १६ ऑगस्ट
तिसरा - २३ ऑगस्ट
चौथा - ३० ऑगस्ट
पाचवा - ६ सप्टेंबर
९ ऑगस्टपासून श्रावण
९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये पूजाअर्चना होत असते. पर्यटन आणि शिवदर्शनाच्या उद्देशाने भाविक येतात. अभिषेक, पूजन तसेच प्रसाद साहित्य, खेळणी, विविध प्रकारची दुकाने, हाॅटेल्स, लॉज तसेच रिक्षा चालकांना यातून रोजगार मिळतो. मंदिर उघडण्याबाबत निर्णय न झाल्यास श्रावणातील उलाढाल मागील वर्षाप्रमाणे यंदाही ठप्प राहण्याची शक्यता आहे.
------------
मंदिर सुरू होणे आवश्यक
वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रसाद साहित्य, खेळणी, मूर्ती दुकाने, बेल - फुल विक्रेत्यांना मंदिर बंदचा आर्थिक फटका बसला आहे. खेळणीच्या दुकानांवर खरेदीसाठी दर श्रावण सोमवारी शिवभक्तांची गर्दी असते. किमान श्रावणात तरी मंदिरे उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी.
- रामेश्वर गडेकर, दुकान चालक वैद्यनाथ मंदिर परिसर परळी.
-------
आर्थिक उलाढाल ठप्प
वैद्यनाथ मंदिर बंद असल्यामुळे परराज्यांतील भाविक येत नाहीत. त्याचा मंदिर परिसरातील व शहरातील हॉटेल व्यावसायिक, ऑटोरिक्षा, भक्त निवास, लॉजेसच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. उलाढाल ठप्प झाली आहे. श्रावणात मंदिरे उघडणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
- श्याम बुद्रे, हॉटेल व्यावसायिक, वैद्यनाथ मंदिर परिसर.
------