यंदा तुरीचा पेरा दीड पटीने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:32 AM2021-05-23T04:32:51+5:302021-05-23T04:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. गतवर्षीपेक्षा १०८२ हेक्टर खरिपाचे क्षेत्र कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. गतवर्षीपेक्षा १०८२ हेक्टर खरिपाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर कापूस, बाजरी क्षेत्रात घट होऊन तुरीचे क्षेत्र सुमारे दीड पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेती आणि शेतकरी यांच्याबाबत संपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून बियाणे, रासायनिक खते याबाबत नियोजन करून तशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्याचबरोबर रासायनिक खताची मात्रा सरासरी दहा टक्के वापर कमी करण्याकरिता प्रत्येक गावात नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. गावोगावी सुपिकता निर्देशांक फलक लावले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
गतवर्षीच्या तुलनेत कापूस लागवडीत घट होण्याचा अंदाज बांधला जात आहे. तो ३० हजार ८७८ हेक्टरवरून २८ हजार ७७८ खाली तर तुरीचे क्षेत्र गतवर्षी ७ हजार १२३ हेक्टर होते. ते यावर्षी १० हजार ३२३ हेक्टरवर जाईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. याशिवाय सोयाबीन २०५०, भुईमूग १६००, उडीद ६५०, मूग १००५, मका ११०, बाजरी ५२२०, कारळे ७० व तीळ ८० हेक्टर आदींसह तालुक्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे असेल. त्यादृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आली.
तालुक्यासाठी १०४४२ मेट्रिक टन खताची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्यात युरिया ४४५०, डीएपी १५२१, पोटॅश ३७० व अन्य ४११४ मेट्रिक टन खताची मागणी केल्याची माहिती कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी दिली. शेतकरी भविष्यात खताचा तुटवटा नको म्हणून आताच खत खरेदी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
...
सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी
घरच्या सोयाबीन बियाणांची तपासणी व उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून वापरावे. खताची मात्रा १० टक्क्यांनी कमी करावी. वेळोवेळी कृषी विभागाशी संप्रेरक करून अधिकची माहिती घ्यावी. कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी अमृत गांगर्डे यांनी केले आहे.