जमिनीवरील योगासने आता पाण्यावरही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:38 AM2019-06-21T00:38:19+5:302019-06-21T00:38:46+5:30
जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायाम हे आता पाण्यावरही तरंगत करता येतात. ही अनोखी संकल्पना अंबाजोगाईत साकार झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : जमिनीवर सादर केली जाणारी योगासने व प्राणायाम हे आता पाण्यावरही तरंगत करता येतात. ही अनोखी संकल्पना अंबाजोगाईत साकार झाली. प्राचार्य डॉ. आर. एम. हजारी यांनी पाण्यावर तरंगत तासन्तास पाण्यात राहून योगासने व प्राणायाम करून प्रात्यक्षिके ते सादर करतात. या अनोख्या उपक्रमामुळे अंबाजोगाईकर भारावून गेले आहेत.
पाण्यावरील योगासने व प्राणायाम अनोखा उपक्रम आहे. जमिनीवर योगासने केली जातात. मात्र, ती पाण्यावरही शक्य होतील का, याचा सराव योगगुरू प्राचार्य डॉ. डी. एच. थोरात यांच्या संकल्पनेतून पुढे आला. त्यांना प्राचार्य डॉ. आर. एम. हजारी यांनी साथ दिली. याचे प्रात्यक्षिके तीन वर्षांपासून सुरू आहेत. पाण्यात राहून तरंगत ६५ योगासने करता येतात. ही किमया योगाच्या माध्यमातून साध्य झाली. हा प्रयोग अंबाजोगाईतूनच सुरू झाला आहे. डॉ. आर. एम. हजारी हे पाण्यावर तरंगत शवासन, पद्मासन, पर्वतासन, मर्कटासन मत्स्यासन, भद्रासन, पवनमुक्तासन, वृक्षासन, नौकासन, धनुरासन, कपालभारती, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम व ध्यानसाधना ही सर्व योगासने व प्राणायामाचे ६५ योगासने सादर करतात. जमिनीवर ज्या हालचाली करणे अवघड व दुरापास्त असते. त्या हालचाली पाण्यावर सोयीस्कर ठरतात. आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पाण्यावरील योगाने अनेक व्याधीपासून मुक्तता देतात, अशी माहिती डॉ. हजारी यांनी दिली.