'मी सांगूनही ट्रॅक्टर सोडले नाही'; राष्ट्रवादी आमदारांच्या पीएकडून पोलिसाला शिवीगाळ
By सोमनाथ खताळ | Published: April 27, 2023 11:30 AM2023-04-27T11:30:17+5:302023-04-27T11:30:39+5:30
पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली.
बीड : मी सांगितलेले ट्रॅक्टर का सोडले नाहीस, असे म्हणत आष्टीतील राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांच्या पीए ने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच दुचाकीची चावी काढून घेत त्यांना कर्तव्यावर जाण्यापासून रोखले. ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली. याप्रकरणी पीए विरोधात अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पारखे असे या पीएचे नाव आहे.
२३ एप्रिल रोजी अंमळनेर ठाण्याचे पोलिस कर्मचारी जालिंदर बनसोडे यांनी एक ट्रॅक्टर पकडला होता. तो सोडण्यासाठी पारखे यांनी कॉल केला होता. तरीही ट्रॅक्टर न सोडल्याने २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी पिंपळवंडीत आल्यावर बनसोडे यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली. दरम्यान, पीए सुनिल पारखे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. शेती कामासाठी जाणारे ट्रॅक्टर पकडले तेव्हा अंमळनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो. मी या कर्मचाऱ्याला ओळखतही नाही. आपण आमदारांचा पीए आहोत, हे खरे असल्याचेही ते म्हणाले.