तू पसंत नाहीस! पतीचा झोपेतच आवळला गळा, मेहंदीचे रंग उडण्याआधीच नवविवाहितेचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:09 PM2022-11-14T16:09:52+5:302022-11-14T16:10:21+5:30

तीन आठवड्यापूर्वी झाले होते लग्न, खून केल्यानंतर ओरडत आली पत्नी बाहेर

You don't like it! The husband's murder while sleeping, the act of newlyweds before the color of the mehandi faded | तू पसंत नाहीस! पतीचा झोपेतच आवळला गळा, मेहंदीचे रंग उडण्याआधीच नवविवाहितेचे कृत्य

तू पसंत नाहीस! पतीचा झोपेतच आवळला गळा, मेहंदीचे रंग उडण्याआधीच नवविवाहितेचे कृत्य

Next

गेवराई (जि. बीड) : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी लग्न झालेले. हातावरील मेहंदीचे रंग ताजे होते. मात्र, सुखी संसाराची स्वप्नं रंगवत झोपी गेलेल्या पतीचा पत्नीने गळा दाबून खून केला. पती पसंत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे ७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने तालुका सुन्न झाला आहे.

पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय २४, रा. निपाणी जवळका तांडा, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. त्याची आई नीलाबाई राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, त्या पती, दोन मुलांसह राहतात. मुलीचे लग्न झालेले असून, ती सासरी नांदते. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांचा मुलगा पांडुरंग याचा विवाह पौळाचीवाडी (ता. गेवराई) येथील शीतल बंडू जाधवशी झाला होता. लग्नानंतर ती सासरी नांदण्यास आली. ७ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर रात्री ९ वाजता शीतल व पांडुरंग हे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्री साडेदहा वाजता शीतल ओरडत खोलीबाहेर आली. तुमच्या लेकाला काही तरी झाले आहे... ते बोलत नाहीत.. असे ती म्हणत हाेती.

यावेळी नीलाबाई व राजाभाऊ यांनी आत जाऊन् पाहिले असता पांडुरंग बेशुद्ध होता. त्यास तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्याच्या गळ्यावर व्रण होते. त्यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय सासरच्यांनी व्यक्त केला. उत्तरीय तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी पांडुरंगवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नीलाबाई यांनी सून शीतल विरुद्ध गेवराई ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शीतल चव्हाणवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रेम प्रकरणाची किनार
लग्न झाल्यापासून शीतल नाराज होती. पांडुरंगला ती तू पसंत नाहीस, मला आवडत नाहीस, असे म्हणून राग व्यक्त करत होती. माझे तुझ्यावर प्रेम नाही, तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असे ती एकवेळा म्हटली होती, असे नीलाबाई यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. प्रेम प्रकरणातून तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तीन दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, १२ नोव्हेंबरला गुन्हा नोंद झाल्यावर दि. १३ रोजी गेवराई पोलिसांनी आरोपी शीतल पांडुरंग चव्हाणला ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

Web Title: You don't like it! The husband's murder while sleeping, the act of newlyweds before the color of the mehandi faded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.