'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:25 IST2025-04-09T18:24:02+5:302025-04-09T18:25:21+5:30

''बाहेर असता तर सरपंच संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हालहाल करून भयानक मारले असते''

'You survived because you were in jail!' Mahadev Gitte's wife alleges that Walmik Karad gang threatened him | 'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

'जेलमध्ये म्हणून वाचलास!' वाल्मीक कराड गँगकडून महादेव गित्तेला धमकी दिल्याचा पत्नीचा आरोप

बीड : परळी आणि मस्साजोग खून प्रकरणातील आरोपी बीडच्या कारागृहात होते. त्यांच्यात वाद झाले. यावेळी वाल्मीक कराड गँगमधील सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीकडून आपला पती महादेव गित्ते याला जेलमध्ये म्हणून वाचलास. बाहेर असता तर सरपंच संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हालहाल करून भयानक मारले असते, अशी धमकी दिल्याचा आरोप महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्ते यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह इतर टोळी, तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील साथीदार महादेव गित्तेसह इतर आरोपी हे बीडच्या कारागृहात आहेत. ३१ मार्च रोजी कारागृहात आठवले गँग, कराड गँग आणि गित्ते गँग यांच्यात वाद झाला होता; परंतु कारागृह प्रशासनाने दुसऱ्यांविरोधातच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महादेव गित्ते आणि आठवले गँगला दुसऱ्या जेलमध्ये हलवले होते. यात महादेव गित्ते यानेही तक्रार करत या सर्व भांडणामागे कराड असल्याची तक्रार करत सीसीटीव्ही तपासण्याची मागणी कारागृह प्रशासनाकडे केली होती. त्याची अद्यापही चौकशी झालेली नाही.

मीरा गित्तेंनी घेतली एसपींची भेट
महादेव गित्ते याची पत्नी मीरा गित्ते यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांन केली; परंतु काँवत यांनी हे प्रकरण कारागृह प्रशासनाकडे येते, त्यांच्याकडे तक्रार करा, असे सांगितल्याचे मीरा गित्ते यांनी सांगितले.

तीन दिवस प्लॅन
३१ मार्चला कराड गँगमधील सुदर्शन घुले आणि इतरांनी माझ्या पतीसह इतरांना मारहाण केली. जवळपास १० जण मारहाण करत होते. याची तीन दिवस आधीच प्लॅनिंग झाल्याचा आरोपही मीरा गित्ते यांनी केला आहे, तसेच जेलरच्या ऑफिसमध्येच कराडने मिटिंग घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: 'You survived because you were in jail!' Mahadev Gitte's wife alleges that Walmik Karad gang threatened him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.