तुम्हीच सांगा, चिमुकल्यांवर उपचार अन् गर्भवतींची प्रसूती करायची कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:31 AM2021-04-15T04:31:49+5:302021-04-15T04:31:49+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केले ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने खाजगी डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केले आहेत. यात बाल व स्त्री रुग्णालयांचा जास्त समावेश आहे. मागील काही दिवसांपासून ही संख्या गतीने वाढत आहे. ‘तुम्हीच सांगा, चिमुकल्यांवर उपचार अन् गर्भवतींची प्रसूती करायची कोठे?’ असा प्रश्न त्यामुळे आता सामान्यांमधून याच डॉक्टरांना विचारला जात आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या ३४ हजारांच्या घरात पोहोचली आहे, तसेच मृत्यूही कमी होत नाहीत. वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय आरोग्य संस्थेत खाटांची संख्या अपुरी पडत आहे, तसेच काही लोकांचा शासकीय संस्थांवर विश्वास नसल्याने ते खाजगी रुग्णालयात जातात. रुग्ण भरतीमुळे खाजगी रुग्णालये वाढत आहेत. आरोग्य विभागाकडे कोरोना सेंटर तयार करण्यासाठी खाजगी डॉक्टर गर्दी करू लागले आहेत. ज्या रुग्णालयात कधी १० पेक्षा जास्त रुग्ण जात नव्हते, तेथे सद्य:स्थितीत खाटा अपुऱ्या पडत आहेत. रुग्णांची गरज पाहता खाजगी डॉक्टर नियमांपेक्षा जास्त बिल आकारून आर्थिक लूट करत आहेत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून बाल, स्त्री रुग्णालयांचे रूपांतर हे खाजगी डॉक्टर कोविड सेंटरमध्ये करीत आहेत. नाव बाल व स्त्री रुग्णालयाचे अन् उपचार कोरोनाबाधितांवर केले जात आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील जवळपास खाजगी रुग्णालयांतील खाटा पूर्ण झाल्या आहेत. नॉनकोविड हॉस्पिटल कोविडमध्ये रूपांतरित होत असल्याने इतर रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे, तसेच सामान्यांचेही हाल होत आहेत. आपत्तीच्या नावाखाली प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटमार केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
एका फिजिशियनवर चार- चार हॉस्पिटलची जबाबदारी
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात फिजिशियनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांना जास्त मागणी होत आहे. कोविड सेंटरला परवानगी देताना फिजिशियनचा बाँड घेतला जात आहे. एका फिजिशियनने चार- चार रुग्णालयांसाठी बाँड लिहून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, तर काही फिजिशियन कंत्राटी पद्धतीने सरकारीत काम करून नंतर खाजगीत उपचार करीत असल्याचे सांगण्यात आले.
रेमडेसिविरसाठी नातेवाइकांच्या हाती चिठ्ठी
ज्या खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल आहे, त्याच रुग्णालयात सर्व औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे; परंतु हे खाजगी डॉक्टर रेमडेसिविरच्या इंजेक्शनची चिठ्ठी लिहून नातेवाइकांच्या हाती ठेवत आहेत. यात त्यांची धावपळ होत आहे, तर दुसऱ्या बाजूला औषधी मिळत नसल्याची धास्ती घेऊन रुग्णांची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे सांगण्यात येत आहे. खाजगी डॉक्टर मात्र, केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नॉनकोविड रुग्णालयांतही गर्दी
जिल्ह्यातील खाजगी बाल व स्त्री रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर होत असल्याने आहे त्या नॉनकोविड रुग्णालयांमध्ये गर्दी होत आहे. रुग्णांची गर्दी असल्याने त्यांना तासन्तास बसावे लागते. जिल्हा रुग्णालयातही प्रसूती व ओपीडीची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
--
...अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण कोविड संस्था ८२
शासकीय आरोग्य संस्था ३२
खाजगी संस्था ५०
===
एकूण खाटांची क्षमता ६,८३२
मंजूर खाटा ६,५५२
रिकाम्या खाटा ३,०५०