कंपनीने कामावरून काढल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 06:45 PM2021-05-26T18:45:18+5:302021-05-26T18:46:12+5:30
अजय सलगर हा सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता.
परळी : खासगी कंपनीने कामावरून कमी केल्याने नैराश्यातून एका २२ वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाघाळा येथे मंगळवारी सकाळी घडली. अजय बन्सी सलगर असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजय सलगर हा सहा महिन्यांपूर्वी एका खाजगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने कडक निर्बंध लागू झाल्याने कंपनीने त्याला कामावरून कमी केले. यामुळे पाच दिवसांपूर्वी तो गावाकडे आला होता. नोकरी गेल्याने तो नैराश्यात होता. मंगळवारी सकाळी त्याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. अशी माहिती अजयचा चुलत भाऊ भानुदास सलगर यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली. बुधवारी परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस नाईक चंद्रकांत आंबाड यांनी वाघाळा येथे सलगर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जवाब नोंदविला आहे, अजयच्या पश्यात आईवडील एक लहान भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता मुलगा गेल्याने सलगर कुटुंबास जबर धकका बसला आहे.