तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 03:46 PM2021-03-15T15:46:48+5:302021-03-15T15:47:25+5:30

Beed Civil Hospital डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

The young man died in agony, but the surgeons did not come | तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

Next
ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन अन् डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

बीड : रूग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या तरूणाला अपघात विभागात दाखल केले. तात्काळ सर्जनला कॉल दिला. परंतु,  ते आलेच नाहीत. अखेर ८ तासानंतर जखमी तरूणाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अबोध भोसले (वय ३१ रा.सावरगाव ता.भूम जि.उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. अबोधचे शिक्षण डीएड झालेले आहे. तो सध्याा पुण्याजवळील एका गावात रहात होता. काही दिवसांपूर्वीच त्याने तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात सुदैवाने तो बचावला आणि त्याला एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होते. परंतु परिस्थिती गरीब असल्याने त्याला बीडच्या जिल्हा रूग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल केले. त्याच्यावर स्थलांतरीत रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अबोधने वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याला पाठीला थोडी जखम झाली होती, परंतु आतमध्ये जास्त जखम असल्याचे सांगण्यात आले. त्याला तात्काळ अपघात विभागात दाखल केले. 

येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकर काशीद यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ यांना कॉल देण्यात आला. मानसोपचारतज्ज्ञांनी येऊन तपासणी करीत औषधी दिले. परंतु अबोधला शरिरात आतून जखम असल्याने सर्जनची गरज होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अबोधने शेवटचा श्वास घेतला. अबोध तडफडून मेला परंतु सर्जन रूग्णालयात फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत पोलीस चौकीत अबोधचा भाऊ आमोल यांनी जबाब दिला आहे.

फिजिशियनही फिरकेनात
जिल्हा रूग्णालयात कोवीड वॉर्डमध्ये चार तर स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात ३ असे सात फिजिशियन आहेत. असे असतानाही स्थलांतरीत रूग्णालयात कॉलवर या फिजिशियनला न ठेवता इतर डॉक्टरांच्या ड्यूट्या लावल्या जातात. हे फिजिशियन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने इकडे कधीच फिरकत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीएस डॉ.राठोड यांनी इतर डॉक्टरांना ड्यूटी लावल्याचेही मान्य केले.

सीएस, एसीएस विरोधात सामान्यांमध्ये रोष
मागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयातील कारभार ढेपाळला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते, एसीएस डॉ.सुखदेव राठोड हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. कसलेही नियोजन नसल्याने सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत. शिवाय अबोधसारख्यांचा रोज जीव जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात सामान्यांमध्ये तीव्र रोष आहे.

अपघात विभागात डीएमओने तपासले होते
हा तरूण दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला मानसोपचार तज्ज्ञ, फिजिशियनने उपचार केले होते. रविवारी रात्री हा तरुण इमारतीवरून पडला. तो गंभीर जखमी होता. अपघात विभागात डीएमओने तपासले होते. सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आरोपाचे काय तर बघु.
- डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड
 

Web Title: The young man died in agony, but the surgeons did not come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.