दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता तरुण, एकाने खाजगी इलाज सांगितला अन जीव गमावून बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 11:56 AM2022-01-11T11:56:13+5:302022-01-11T11:56:54+5:30
दारु सोडण्याच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने तरुणाचा मृत्यू
बीड : दारु सोडण्यासाठी खाजगी व्यक्तीने दिलेल्या औषधाचा ओव्हर डोस झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. राजापूर (ता. गेवराई) येथे ९ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी औषध देणाऱ्या दोघांवर तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. लक्ष्मण दामू भांगे (३३,रा. जिरेवाडी ता. बीड) असे मयताचे नाव आहे.
लक्ष्मण भांगे हा नाथापूर येेथे एका हॉटेलात वेटर म्हणून काम करायचा. त्याला दारुचे व्यसन जडले होते. दारुचे व्यसन सोडण्यासाठी राजापूर येथे एकजण औषध देतो, अशी माहिती मिळाल्यावरून तो तेथे गेला होता. ६ जानेवारी रोजी तो औषध घेण्यासाठी तेथे मुक्कामी राहिला. दरम्यान, औषधाचा ओव्हर डोस झाल्याने त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत लक्ष्मणचा भाऊ गणेश भांगे यांच्या तक्रारीवरुन औषध देणाऱ्यासह अन्य एक अशा दोन अनोळखींवर तलवाडा ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक सुभाष माने यांनी सांगितले.