तरुणांनो! तुम्ही तंदुरूस्त आहात, पण ज्येष्ठांना पोहोचतोय धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:29+5:302021-04-14T04:30:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. नवे रुग्ण आढळण्यासह रोज ५ पेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. नवे रुग्ण आढळण्यासह रोज ५ पेक्षा जास्त लोकांचा जीव जात आहे. यात जास्त ज्येष्ठ लोकांचा समावेश आहे. या ज्येष्ठांची काळजी घेण्याची गरज आहे. घरातील तरूण बाहेर फिरतात. त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना त्रास होत नाही. परंतु घरातील ज्येष्ठांना संसर्ग होऊन त्रास होत आहे. कोरोनाने ज्येष्ठांना उद्दिष्ट करून अनेकांचे जीवही घेतले आहेत. त्यामुळे तरुणांनी स्वत:सह घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील एकूण काेरोनाबाधितांचा आकडा ३३ हजारांच्या वर गेला आहे. रविवारी तर बाधितांच्या संख्येने १ हजाराचा टप्पा ओलांडला होता. तसेच मागील आठवडाभरात रोज १० पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याबाबत आवाहन केले जात असतानाही काही लोक याकडे दुर्लक्ष करून बिनधास्त फिरत आहेत. त्यातच ते काळजीही घेत नाहीत. यात सर्वाधिक समावेश हा तरुणांचा आहे. घरात न बसता बाहेर फिरतात आणि कोरोनाला घरात आणतात.
बाहेर फिरताना अशी घ्या काळजी
कामासाठीच घराबाहेर पडावे, विनाकारण पडून स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव घोक्यात घालू नका. तोंडाला कायम मास्क ठेवावा आणि इतरांनाही सांगावे.
गर्दीत जाणे टाळवे. सोशल डिस्टन्स ठेवूनच आपली कामे करावीत. आपल्यापासून दुसऱ्याला व त्याच्यापासून आपल्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
बाहेरून घरी आल्यावर स्वत:ला सॅनिटाईज करून घ्यावे. तसेच घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्व कपडे, हात, पाय स्वच्छ धुवून घ्यावेत, आंघोळ करावी.
ही पहा उदाहरणे...
बीड शहरातील सुभाष रोड भागातील एक २९ वर्षीय तरूण व्यवसायासाठी नेहमी बाहेर फिरत असे. एके दिवशी तो कोरोनाबाधित आढळला. घरात वृद्ध आई-वडील आहेत. त्यांची चाचणीही केली नाही. नंतर आठवड्याने त्यांना त्रास सुरू झाला. चाचणी निगेटिव्ह आली. परंतु एचआरसीटी स्कोअर ८ असल्याने त्रास झाला होता.
जिल्हा रुग्णालयातीलच एक कर्मचारी कोरोनापासून दूर पळत होता. दोघांची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर आईचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन दिवसांनी हा कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळला. आईची प्रकृती स्थिर होती. जिल्हा रुग्णालयातच तिच्यावर उपचार झाले. कर्मचारी तरुणाला त्रास झाला नाही, पण आईला झाला.
लहान असो वा तरूण, ज्येष्ठ असो वा वृद्ध, प्रत्येकाने कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्याने कमी त्रास होतो, परंतु ज्येष्ठांना याचा जास्त त्रास होत आहे. त्यामुळे तरुणांनी विनाकारण बाहेर फिरू नये. घराबाहेर गेले तरी घरात आल्यावर सॅनिटाईज करून अंगावरील कपडे निर्जंतूक करून घ्यावे. कोरोना नियम पाळावेत.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड