तरुणीला पोलिस भरतीचे आमिष; बीड एसपींच्या तत्कालीन स्टेनोसह चौघांवर गुन्हा
By सोमनाथ खताळ | Published: June 20, 2024 10:25 AM2024-06-20T10:25:24+5:302024-06-20T10:25:44+5:30
बीडमधील प्रकार : मुंबईमध्ये भरती करून देतो म्हणून घेतले लाख रुपये.
सोमनाथ खताळ, बीड : पोलिस दलात भरती करून देतो, असे म्हणत बीडमधील एका अनाथ तरुणीकडून १ लाख रुपये उकळले. त्यातील १७ हजार रुपये परत केले. परंतु राहिलेले ८३ हजार रुपये परत न करता शिवीगाळ करून फसवणूक केली. याप्रकरणी बीडचे पोलिस अधीक्षक यांचे तत्कालीन स्टेनो सुरेश काथार यांच्यासह चौघांविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरेश काथार, संजय कुलकर्णी, पंढरी जायनुरे आणि चिंतन गारगोटे, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
बीड शहरातील २५ वर्षीय तरुणी पोलिस भरतीची तयारी करत आहे. तिची एप्रिल २०२३ मध्ये जिल्हा रुग्णालयात संजय कुलकर्णी यांच्यासोबत ओळख झाली. त्यांनी पोलिस अधीक्षक यांचे तत्कालीन स्टेनो सुरेश काथार यांच्यासोबत २४ एप्रिल २०२३ रोजी ओळख करून दिली. काथार यांनी नांदेडच्या पंढरी जायनुरे/मिसे याचा संपर्क क्रमांक दिला आणि ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात संवाद होत राहिला. याच दरम्यान तरूणीने मुंबई शहरची पोलिस भरती परीक्षा दिली होती. चांगले गुण असतानाही तिला प्रतीक्षेत ठेवले. त्यामुळे तिने पंढरीला कॉल करून मी काही करता येते का पाहा, असे सांगितले. त्यानंतर पंढरीने तिला जून २०२३मध्ये पुणे येथे बाेलावले. तेथे चिंतन हनुमंत गारगोटे हा ॲंटी करप्शन ब्यूरोचा अधिकारी आहे, असे सांगून ओळख करून दिली. यावेळी त्याने आगोदर दोन मुलांचे १० लाख रुपये घेऊन काम केल्याचे दाखवले. परंतु तू मुलगी असल्याने तू पाच लाख रुपये दे, असे सांगितले. परंतु पैसे नसल्याने तरूणीने परत बीड गाठले. तरीही त्यांचे कॉल चालूच राहिले. त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. यावर तरूणीने पुणे येथे जाऊन त्यांना ते पैसे दिले. काही दिवसांनी मुंबई शहरची अंतिम यादी लागली. यामध्ये तरूणीचे नाव नव्हते. यावर तिने विचारले असता सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर काही दिवसांनी पंढरी याने १७ हजार रुपये फोन पेवर परत पाठविले तर २५ हजार रुपयांचा चेक दिला. परंतु हा चेक वटला नाही. त्यानंतर वारंवार संपर्क करून पैसे मागितल्यावरही ते दिले नाहीत. उलट शिवीगाळ केली. त्यामुळे आपली ८३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत तरूणीने बीड शहर पोलिस ठाणे गाठून चौघांविरोधात फिर्याद दिली.
सुरेश काथार झाले निवृत्त
सुरेश काथार हे बीडमध्ये असताना वादग्रस्त ठरले. अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पाेलिस अधीक्षकांकडे तक्रारी केल्या होत्या. २०२३ मध्येच काथार हे सेवा निवृत्त झाले आहेत. कार्यरत असतानाच त्यांनी तरुणीला आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.