स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात केजमधून एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 07:20 PM2018-07-02T19:20:51+5:302018-07-02T19:22:21+5:30
लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
केज (बीड ) : लातुर येथील स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल (गावठी कट्टा) हे केज शहरातील युवकांने मारेकर्यास पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले. मारेकऱ्यांना पिस्टल पुरविणार्या या युवकास लातुर पोलीसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले.
मागील आठवड्यात लातुर येथील स्टेप बाय स्टेप चे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येने राज्याचे शिक्षण क्षेत्र हादरवून गेले होते. या प्रकरणात आता नवीन माहिती उघडकीस आली असून हत्येसाठी करणसिंह धैरवाल याने वापरलेले पिस्टल (गावठी कट्टा ) हे केज येथील युवकाने पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.
यावरून शहरातील समर्थ नगर भागात राहणार्या रमेश श्रीकांत मुंडे (35) यास लातुर येथील शिवाजी नगर पोलीसांनी रविवार रात्री अटक केली. रमेश याने हत्येसाठी पिस्टल पुरवल्याची कबुली दिली आहे. आज न्यायालयाने त्याला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली.