अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणास बारा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:37 PM2018-03-20T18:37:32+5:302018-03-20T18:37:32+5:30
एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी देवळा येथील आरोपी विनोद राजाभाऊ गुरखेल यास अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर .चौधरी यांनी बारा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला.
अंबाजोगाई (बीड ) : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी देवळा येथील आरोपी विनोद राजाभाऊ गुरखेल यास अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर .चौधरी यांनी बारा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला.
अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील विनोद राजाभाऊ गुरखेल याने दिनांक 27 मार्च 2011 रोजी गावातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिला पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विनोद याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने त्या मुलीस अंबाजोगाई येथील बसस्थानकासमोर सोडून दिले. यांनतर 1 एप्रिल 2011 रोजी मुलीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.आर .चौधरी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
यावेळी 9 साक्षीदार तपासण्यात आले. ज्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पीडिताची तपासणी केली होती त्यांनी न्यायालयात आपली साक्ष फिरवली. परंतु सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारी वकील लक्ष्मण फड यांचा युक्तिवाद पुरावे व पीडिता व तिच्या वडीलाची साक्ष ग्राह्य धरत आरोपी विनोद यास बलात्कार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बारा वर्षे सक्तमजुरी व पन्नास हजार रुपये रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.पिडीत मुलीच्या वतीने सरकारी वकील अॅड.लक्ष्मण फड यांनी युक्तिवाद केला.