माजलगाव तहसीलच्या आवारातील सेफ्टीक टॅंकमध्ये दुचाकीसह तरुण पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 07:35 PM2020-03-09T19:35:55+5:302020-03-09T19:36:58+5:30
तहसील परिसरात उपस्थित नागरिकांनी बचाव कार्य केले
माजलगाव : येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फुटलेल्या ३० फूट खोल सेफ्टीक टॅंकमध्ये मोटरसायकलसह तरुण पडल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, नागरिकांनी तात्काळ दोराच्या साहाय्याने मदतकार्य करून हरिभाऊ पंडित भारसावडे या तरुणाचे प्राण वाचवले.
येथील तहसील कार्यालयाचे आवार मोठे व प्रशस्त असून या परिसरात दुय्यम निबंधक कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय आहे.याच बरोबर मोकळ्या जागेवर झाडेझुडपे प्रचंड वाढलेली आहेत. तहसील कार्यालयाकडून वाळु बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येते. या कार्यवाहीसाठी टिप्पर, ट्रॅक्टर जेसीबी मशीन अशी पाच-पाच ब्रास वाळू भरलेली अवजड वाहने तहसील कार्यालयात आणण्यात येतात व ही वाहने पाठीमागील बाजूस असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला उभे केली जातात. मागील पाच दिवसांपूर्वी वाळूने खचाखच भरलेले टिप्पर या भागात आणले व ते टिप्पर तहसीलच्या सेफ्टीक टॅन्कवरून जाताच त्याचा स्लॅब आतमध्ये कोसळला. याबाबत दुय्यम निबंधक यांनी तात्काळ पत्र लिहून तहसील कार्यालयास कळवले,मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.
दरम्यान, सोमवारी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयात हरिभाऊ पंडित भारसावडे हा दुचाकी ( एम एच ४४-एफ-६५१८ ) आला. तेथून जात असताना टॅंकचा स्लॅब पडलेला त्याला दिसले नाही व तो दुचाकीसह त्यात कोसळला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला, टॅंक मध्ये दुर्गंधीयुक्त घाणपाणी होते त्यात तो पडला. त्या मध्ये मलबा असल्याने तो बुडाला नाही. तेथील नागरिकांनी तात्काळ दोर आणून त्याद्वारे तरुणास बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. हरिभाऊ यास किरकोळ जखम झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे.