जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयांची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 04:11 PM2017-07-18T16:11:27+5:302017-07-18T16:12:29+5:30
देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ऑनलाईन लोकमत
बीड/ माजलगाव : देशभर स्वच्छ भारत अभियान राबवले जात असताना मात्र परंतु माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शौचालयाची सोयच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास ५० टक्के शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच नाही तर जेथे व्यवस्था आहे ते वापरण्या योग्य नाहीत.
केंद्र व राज्य शासन घरोघर शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देत असुन यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यासोबतच लाखो रुपयांचा निधी जनजागृती करण्यासाठी हि खर्च करण्यात येतो. जिल्हा परिषदेकडुन तर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी विविध पथकांची नेमणुक करुन उघडयावर शौचास बसणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे स्वतः पथकासोबत राहुन लोकांवर कारवाई करतांना दिसुन येतात मात्र त्यांच्याच अधिपत्याखाली असणा-या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालयांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अर्ध्याधिक शाळांमध्ये तर शौचालय नाही आणि जेथे आहे तेथिल शौचालये वापरण्या योग्य नाहीत.
यातच माजलगांव येथील गटशिक्षणाधिका-यांचे पद रिक्त आहे. प्रभारी कारभार असल्याने केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही यामुळेच अत्यंत गरजेच्या शौचालयाच्या सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा त्रास मात्र शाळकरी मुलांना होत असून त्यांना उघडयावर शौचासाठी जावे लागत आहे. यातून स्वच्छ भारत अभियान राबविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा परिषदेवर आहे त्यांच्याकडुनच स्वच्छतेला हरताळ फासण्याचा प्रकार होत असल्याचे चित्र आहे.
या बाबत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवा मोंढा चे मुख्याध्यापक जे.सी. देशमाने यांना विचारणा केली असता, आठवडी बाजार शाळेशेजारीच भरत असल्याने कितीही स्वच्छता केली तरी अस्वच्छता होतेच असे सांगीतले. तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर.व्ही. महामुनी यांनी आमच्या सर्व शाळांमध्ये शौचालये बांधलेली असुन त्याचा वापर शंभर टक्के होत आहे. तसेच ती शौचालये अत्यंत स्वच्छ ठेवले जातात असे सांगीतले.