जिल्ह्यात ६० लाख रोपांची लागवड करणार जिल्हा परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:50+5:302021-05-29T04:25:50+5:30
बीड : येत्या जागतिक पर्यावरण दिनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने एक व्यक्ती तीन झाडे लावण्याचा संकल्प केला असून ठरवलेल्या कृती ...
बीड : येत्या जागतिक पर्यावरण दिनापासून जिल्हा परिषदेच्या वतीने एक व्यक्ती तीन झाडे लावण्याचा संकल्प केला असून ठरवलेल्या कृती कार्यक्रमानुसार ६० लाख २९ हजार ४७९ झाडे लावण्यात येणार आहेत. शुक्रवारी यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), यांची व्हीसी घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. दिवसेंदिवस कमी होत जाणारे झाडांचे प्रमाण व परिणामी त्याचा जैविक विविधतेवर होणारा दुष्परिणाम , अशुद्ध हवा यामुळे मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २०२१ च्या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती, तीन झाडे’ याप्रमाणे लागवड करून जोपासना करण्याचे आवाहन केले आहे.
त्यायानुसार उपक्रमास गती देण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने एक कृती कार्यक्रम तयार केला आहे. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ असून या दिवशी वृक्ष लागवड २०११ चा शुभारंभ करण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान १०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गती देण्यासाठी तसेच वृक्ष संगोपनामध्ये सातत्य राहण्यासाठी पाच ग्रामपंचायतींसाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार असून दर आठवड्यास आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्यासाठी एक संपर्क अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना थेट अहवाल सादर करतील.
----------
चांगल्या कामांचा पुरस्कार, कामचुकारांना शास्ती
वृक्षलागवड २०२१ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत व पंचायत समितींना पारितोषिक देण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शास्ती देण्याबाबतची कारवाईदेखील करण्यात येणार आहे.
------
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक घनदाट वृक्षलागवड
सर्व ग्रामपंचायतनिहाय लावावयाच्या रोपांचे स्थळ निश्चिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सुमारे २० लाख ९ हजार ८२६ लोकसंख्या असून सुमारे ६० लक्ष २९ हजार ४७९ रोपांची लागवड करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक घनदाट वृक्ष लागवड जागा व पाण्याच्या उपलब्धतेनुसार करण्यात येणार आहे.
--------