बीडमध्ये जि.प. शिपायाचा घरातच आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:14 AM2018-05-30T00:14:58+5:302018-05-30T00:14:58+5:30
बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीड : शहरातील पेठबीडमधील गांधीनगर भागात एकनाथ अण्णा मिटकरी (४७) यांचा मृतदेह बंद घरात आढळून आला. परंतु खांद्याला जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या तरी पेठ बीड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन अहवाल आला नव्हता. त्यामुळे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकनाथ मिटकरी हे जिल्हा परिषद विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून या दोघांचेही लग्न झालेले आहे. त्यांचा मुलगा आष्टी येथे राहत असल्याने ते एकटेच आपल्या गांधीनगर येथील घरी राहत होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून बघितला असता घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पेठ बीड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक बी.एस.बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आल. शवविच्छेदन झाले असले तरी त्याचा अहवाल उशिरापर्यंत प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू असून लवकरच याचे कारण शोधले जाईल, असे पोनि बडे यांनी सांगितले.
दुर्गंधीमुळे प्रकार उघड; शेजा-यांनी दिली माहिती
मिटकरी यांच्या घरातून दुर्गंधी सुटल्याने शेजाºयांनी पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. दुर्गंधी सुटल्याने त्यांचा मृत्यू १२ तासांपूर्वीच झाल्याचे बोलले जात आहे. उष्णता व इतर कारणांमुळे दुर्गंधी सुटली होती. त्यांच्या अंगावर कुठल्याही धारदार शस्त्राचे व्रण नसले तरी खांद्याला मात्र थोडी जखम असल्याने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.