जि.प. आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी नरेश कासट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:01 AM2021-02-06T05:01:45+5:302021-02-06T05:01:45+5:30
बीड : जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची उच्चशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. ...
बीड : जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रशासन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची उच्चशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी बीडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांची नियुक्ती केेली आहे. गुरुवारी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली.
जिल्हा आरोग्य विभागाला रिक्त पदांची अगोदरच घरघर आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी, माता व बालसंगोपन अधिकारी अशा महत्त्वाच्या पदावर हक्काचे अधिकारी नाहीत. त्यामुळे या पदांचा अतिरिक्त पदभार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासन अधिकारी या पदाचा पदभार सांभाळणारे धारूरचे तालुका आराेग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची उच्चशिक्षणासाठी अंबाजोगाई येथे नियुक्ती झाली आहे. त्यामुळे गुरुवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्याकडील प्रशासन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आता डॉ. नरेश कासट यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद अद्यापही रिक्त आहे. डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्याकडे हा पदभार देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले; परंतु यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नव्हता.
शेकडेंना निरोप, कासट यांचे स्वागत
सचिन शेकडे यांना गुरुवारी सकाळीच आरोग्य विभागाकडून निरोप देण्यात आला, तर नरेश कासट यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर.बी. पवार, डॉ. एल.आर. तांदळे, डॉ. अशोक गवळी, डॉ. बायस, डॉ. संतोष गुंजकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.