'झेडपी' शिक्षिकेचा जगात बोलबाला; पाकिस्तानसह तीन देशांतील विद्यार्थ्यांना देतेय ऑनलाईन धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 07:40 PM2022-02-18T19:40:53+5:302022-02-19T01:13:26+5:30
चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले असून देशभरासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आहेत.युट्यूबवरील व्हिडिओतून १८ कोटी विद्यार्थ्यांनी घेतले धडे
बीड : ऊसतोड मजुरांची मुलं आणि शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, बीड जिल्ह्यातील एका शिक्षिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जिल्ह्यातच नाही. तर जगभरात नावलौकिक केलंय. बीड जिल्ह्यातील ढेकनमोहा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देणाऱ्या या शिक्षिका आहेत, उषा ढेरे. यांची चर्चा सध्या जिल्ह्यातच नाही तर जगभरात होतेय. त्यांच्या शिक्षण विषयक व्हिडीओतून भारतासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथीलही लाखो विद्यार्थी ऑनलाईन धडे गिरवत आहेत.
चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले. या चॅनलला जगभरातून जवळपास साडेचार लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. आतापर्यंत देश-विदेशातील 18 कोटी 70 लाख विद्यार्थ्यांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या या संकटातही संधी शोधण्याचं काम उषा ढेरे यांनी करून दाखविले आहे. कोरोना काळात शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. अशातच त्यांनी निर्माण केलेल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. शाळा बंद असताना शिक्षणासाठीचे त्यांनी केलेले काम नेत्रदीपक ठरत आहे. समाज शास्त्र आणि इंग्रजी मध्ये एमए झालेल्या उषा ढेरे यांनी स्टडी फ्रॉम होमच्या काळात आपले काम अत्यंत प्रामाणिक आणि सक्षमतेने केले.
उषा ढेरे यांचे प्राथमिक शिक्षणाचे जवळपास पंधराशे व्हिडिओ युट्युब वर अपलोड आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 16 कोटी 67 लाख एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. राज्यातल्या गावागावातील विद्यार्थ्यांनी या व्हिडिओतून आपले शिक्षण सुरू ठेवले. याशिवाय इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आणि व्ह्युवर्स या व्हिडिओला लाभले आहेत. समाजातील प्रत्येक विद्यार्थांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेता यावं. यासाठी या दोन्ही शिक्षिका प्रयत्न करत आहेत. उषा यांच्या सहशिक्षक असणाऱ्या सुनीता जायभाय यांनी देखील प्रत्यक्ष कृतीतून व्हिडिओ करून हे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे.
या दोघींच्या ही कार्याच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.उषा ढेरे यांच्याप्रमाणेच इतर शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा असा वापर करून प्रयत्न केला. तर नक्कीच दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल, त्यामुळे इतर शिक्षकांनी असे कार्य हाती घेणे गरजेचंच आहे.