१ मुखी रुद्राक्ष खूपच खास, शिव-शक्तीची मिळेल कृपा; सूर्यासारखे उजळेल भाग्य, शुभ-लाभच लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:26 IST2025-02-20T13:24:18+5:302025-02-20T13:26:10+5:30
1 Mukhi Rudraksha Significance In Marathi: शिव-शक्तीचे प्रतीक मानला गेलेला १ मुखी रुद्राक्ष धारण करण्याने कोणते आणि कसे लाभ होऊ शकतात? जाणून घ्या...

१ मुखी रुद्राक्ष खूपच खास, शिव-शक्तीची मिळेल कृपा; सूर्यासारखे उजळेल भाग्य, शुभ-लाभच लाभ!
1 Mukhi Rudraksha Significance In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याचे महात्म्यही तेवढेच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. यापैकी एक मुखी रुद्राक्ष अगदी खास मानले जाते. जाणून घेऊया...
भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते. १ मुखी रुद्राक्ष जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्ती देणाऱ्या परम शिवाच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो. तसेच, एकमुखी रुद्राक्ष सूर्य ग्रह देवाशी संबंधित मानला जातो.
१ मुखी रुद्राक्ष खूपच खास, शिव-शक्तीची मिळेल कृपा
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमकुवत स्थितीत आहे. त्या लोकांना एक मुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. एक मुखी रुद्राक्ष रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतो, अशी मान्यता आहे. एकमुखी रुद्राक्ष खूप प्रभावी मानला जातो. एक मुखी रुद्राक्ष आध्यात्मिक प्रगती आणि एकाग्रतेसाठी परिधान केले जाते. एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ शकते. तसेच आर्थिक आघाडीवरही लाभ होऊ शकतो, असे सांगितले जाते.
१ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा?
वास्तविक पाहता कोणीही १ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पण एकमुखी रुद्राक्ष सूर्यदेवाशी संबंधित आहे. म्हणून, सिंह राशीच्या लोकांनी तो धारण करणे अधिक फायदेशीर ठरू शकेल. सोमवार, पंचमी तिथी आणि मासिक शिवरात्रीला रुद्राक्ष धारण शकता. १ मुखी रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्यावर गंगाजलाचा अभिषेक करा. ॐ ह्रीम नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्यात १ मुखी रुद्राक्ष धारण करणे नेहमीच शुभ मानले जाते. परंतु, १ मुखी रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यातून धारण करून नये. याचा अशुभ परिणाम होऊ शकतो, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.