सबका मालिक एक! दिव्य अवतारी सत्पुरुष श्री साईबाबांची ११ वचने; पाहा, कालातीत शिकवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:22 IST2025-01-08T10:21:10+5:302025-01-08T10:22:42+5:30
Preaching Of Sai Baba And 11 Timeless Promises: साई महिमा आणि महात्म्य अनन्य साधारण असून, नित्यनेमाने लाखो भाविक साईबाबांची आपापल्यापरिने मनोभावे सेवा करतात.

सबका मालिक एक! दिव्य अवतारी सत्पुरुष श्री साईबाबांची ११ वचने; पाहा, कालातीत शिकवण
Preaching Of Sai Baba And 11 Timeless Promises: साईबाबा महाराष्ट्रातील एक सत्पुरुष. शिर्डीतील म्हाळसापति नामक एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. म्हाळसापती हे पुढे त्यांचे निस्सीम भक्त बनले.
साईबाबांच्या आध्यात्मिक अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय अनेकांना येऊ लागल्यानंतर एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांचे नाव शिर्डी गावाच्या सीमांपलीकडे दूरवर पोहोचले आणि शिर्डीला एका पवित्र स्थळाचे माहात्म्य प्राप्त झाले. साईबाबा स्वतः रामाची उपासना करीत. त्यांचे वागणे धार्मिक भेदांच्या पलीकडचे असे. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होत गेला. ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. शिर्डी येथे त्यांनी देह ठेवल्यानंतर, त्या गावी त्यांच्या समाधी-मंदिराच्या दर्शनार्थ जाणाऱ्यांची संख्या वाढत राहिली. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली गेली आणि जात आहेत. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दिव्य शिष्यांपैकी एक साईबाबा होते, असे मानले जाते. स्वामी महाराजांचा अनुग्रह लाभला होता, असेही सांगितले जाते.
आईच्या मायेने साई बाबा उपदेश करीत
साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत. बाबांच्या चरित्रात दोन गोष्टींना फार महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे उदी आणि दुसरी गोष्ट दक्षिणा. पण या दोन्ही गोष्टी फार सूचक आहेत. त्यात गहन तत्त्वज्ञान भरलेले आहे. उदी ही विवेकाची खूण आहे आणि दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. विवेकाशिवाय वैराग्य निरर्थक असते म्हणून बाबांनी विवेक आणि वैराग्याची सांगड घातली. उदी आणि दक्षिणेची सांगड घातली. उदी म्हणजे बाबांच्या धुनीतील राख. ती राख भक्तांना देऊन बाबा जणू हेच शिकवतात की ज्या देहाचे तू पालनपोषण करतोस, ज्या देहावर तू इतके प्रेम करतोस. त्या देहाची शेवटी चिमूटभर राख होणार आहे- या उदीसारखी. या जगात कोणी कोणाचे नाही. एकटा आलास आणि एकटाच जाणार. तुझ्याबरोबर या जगातील काहीच येणार नाही. असा विवेक करून आजपासूनच परमार्थ मार्गाला लाग. जीवनाची नश्वरता या उदीने सांगितली. या उदीने बाबांनी भक्तांचे असाध्य रोग दूर केले.
श्री साईबाबांची अकरा वचने
शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥
माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥
जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥
नवसास माझी पावेल समाधी । धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥
नित्य मी जिवंत, जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥
शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥
जो जो, मज भजे, जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे, मीही त्यासी ॥ ७ ॥
तुमचा मी भार वाहीन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥
माझा जो जाहला कायावाचामनीं । तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥
साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥
॥ साईनाथ महाराज की जय ॥