१३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:10 PM2024-05-31T14:10:48+5:302024-05-31T14:11:23+5:30

स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर तपश्चर्या केली होती तिथेच आज मोदी ध्यानधारणेला बसले आहेत, हा योगायोग म्हणावा की इतिहासाची पुनरावृत्ती?

131 years ago Narendra became Vivekananda by meditation; Modi's 3 days of meditation is also a coincidence! | १३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग!

१३१ वर्षांपूर्वी ध्यानस्थ होऊन नरेंद्र झाला विवेकानंद; मोदींचा ३ दिवस ध्यानाचा असाही योगायोग!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कन्याकुमारीमध्ये ध्यान करत आहेत. ४५ तास मौनव्रत, उपास आणि ध्यानधारणा करण्याचा त्यांचा बेत आहे आणि त्यांच्या उपक्रमाला सुरुवातही झाली आहे. बरोबर १३१ वर्षांपूर्वी याच ठिकाणी आणखी एका नरेंद्राने ध्यान केले होते आणि तेथे ध्यान केल्यानंतर ते जागतिक धर्म संसदेत भाषण देण्यासाठी शिकागो (अमेरिका) येथे पोहोचले. पुढे जग त्यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखू लागले. कन्याकुमारीतील त्यांच्या ध्यानाने हिंदू धर्माची रूपरेषा बदलली. आज त्याच ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली पुनरावृत्ती नवा इतिहास रचणार का, हे येता काळच ठरवेल!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वेळापत्रकानुसार कन्याकुमारी येथे पोहोचले आहेत. ते तिथे स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये ध्यान करत आहेत. पीएम मोदी तेथे ४५ तास ध्यान करतील. १ जून रोजी संध्याकाळी बाहेर येतील. तत्पूर्वी,  गुरुवारी कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या मंदिरात प्रार्थना केली, दर्शन घेतले. या मंदिराला भगवती अम्मान मंदिर देखील म्हटले जाते. बरोबर १३१ वर्षांपूर्वी, १८९२ मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे आले होते, तेव्हा त्यांनीही समुद्राच्या खडकावर ध्यान करण्यापूर्वी या मंदिरात भक्तिपूर्वक प्रार्थना केली होती आणि आज पंतप्रधान मोदींनीही या मंदिरात दर्शन घेऊन ध्यानाला सुरुवात केली आहे.

पंतप्रधानांनी गुरुवारी संध्याकाळी ६.४५ मिनिटांनी ध्यान सुरू केले, जे आता १ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहील आणि अशा प्रकारे पंतप्रधान मोदी संपूर्ण ४५ तास ध्यानात राहतील. या कालावधीत, ते कोणत्याही प्रकारचे अन्न खाणार नाहीत. फक्त नारळ पाणी, द्राक्षाचा रस आणि पाणी याचे सेवन करतील. ध्यानाच्या या प्रक्रियेत, पंतप्रधान मोदी ४० तास मौन पाळतील आणि त्यांचे ध्यान मोठ्या ओमच्या आकारात असलेल्या ध्यान मंडपममध्ये होईल. कन्याकुमारीच्या ध्यानमंडपममध्ये पोहोचल्यानंतर पीएम मोदींनी स्वामी विवेकानंदांचे गुरू स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांची पत्नी माँ शारदा यांना नमस्कार केला. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या विशाल पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आधी भारताचा दौरा केला, नंतर स्वामी विवेकानंद तिथे पोहोचले

फार कमी लोकांना माहित असेल की १८९२ मध्ये जेव्हा स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीच्या या खडकावर ध्यान केले तेव्हा या ध्यानाने संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित केले. हा तो काळ होता जेव्हा स्वामी विवेकानंद अध्यात्म आणि हिंदू धर्माची विशालता त्यांच्या जीवन तत्त्वज्ञानात आत्मसात करत होते. त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी एक लांबचा प्रवास निवडला होता, ज्यामध्ये ते चार वर्षे भारतभर फिरणार होते आणि हा प्रवास कन्याकुमारीत संपणार होता.

स्वामीजींनी तीन दिवस आणि तीन रात्री ध्यान केले

चार वर्षांच्या अथक तपश्चर्येनंतर १८९२ साली जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे पोहोचले, तेव्हा समुद्राच्या लाटांमध्ये शांत बसलेल्या खडकांमधून त्यांना एक मोठा उद्देश प्राप्त झाला. त्यांनी ठरवले की समुद्रकिनाऱ्यावरून पोहत  पाण्याच्या मध्यभागी एका खडकावर बसून ध्यान करायचे. त्यांनी तसे केले आणि तिथे केलेल्या उपासनेमुळे ते थेट ईश्वराशी जोडले गेले. या खडकापर्यंत पोहोचण्यापूर्वी स्वामी विवेकानंद हे स्वामी विवेकानंद नव्हते. ते आधी नरेंद्रनाथ दत्त म्हणून ओळखले जात होते, त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला होता. पण कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर त्यांनी आजच्या रॉक मेमोरियलवर तीन दिवस आणि तीन रात्री कठोर तपश्चर्या केली आणि ध्यान केले. या ध्यानातून त्यांना मिळालेल्या ज्ञानाने त्यांना स्वामी विवेकानंद बनवले. काही दिवसांनंतर, १८९३ मध्ये, ते अमेरिकेतील शिकागो येथे गेले, जेथे जागतिक धर्म संसदेचे आयोजन केले जाणार होते. या धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या ज्ञानामुळे संपूर्ण जगाचा भारत आणि हिंदू धर्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

स्वामीजींनी धर्मसंसदेत कोणते भाषण दिले?

या ऐतिहासिक भाषणात ते म्हणाले होते की, मला अभिमान आहे, मी त्या हिंदू धर्माचा आहे ज्याने जगाला सहिष्णुता आणि सर्वमान्यतेचा धडा शिकवला आहे. मला अभिमान आहे की मी भारताचा आहे ज्याने सर्व धर्माच्या आणि सर्व देशांतील त्रस्त लोकांना आश्रय दिला आहे. मला अभिमान आहे की आम्ही आमच्या हृदयात इस्रायलच्या त्या पवित्र आठवणी जतन केल्या आहेत, ज्यामध्ये रोमन आक्रमणकर्त्यांनी त्यांची धार्मिक स्थळे नष्ट केली आणि नंतर त्यांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला. मला अभिमान आहे की मी हिंदू धर्माचा आहे, ज्याने पारशी धर्माच्या लोकांना आश्रय दिला आहे आणि आजही त्यांना सतत मदत करत आहे. ते पुढे म्हणाले होते की, ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावणाऱ्या नद्या वेगवेगळ्या वाटेवरून जात शेवटी समुद्राला मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग भिन्न दिसू शकतात, परंतु ते सर्व देवाकडे घेऊन जातात.

इथे विकसित भारत दिसत होता

त्यांच्या भाषणानंतर शिकागोच्या धर्म संसदेत त्यांच्यासाठी दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला. मोठी गोष्ट म्हणजे या भाषणाची प्रेरणा आणि ज्ञान त्यांनी कन्याकुमारीत केलेल्या ध्यानातूनच मिळाले. २५, २६, २७ डिसेंबर १८९२ रोजी स्वामी विवेकानंदजींनी येथे तपश्चर्या केली. येथे त्यांनी विकसित भारत पाहिला. इथेच त्यांना भारतमातेचे दैवी अस्तित्त्व जाणवले असे म्हणतात. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही येथे दोन तास ध्यान केले. स्वामीजींनी जिथे तपश्चर्या केली त्या स्मारकालाही स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे. अशा स्थितीत या ठिकाणी ध्यानधारणेचे महत्त्व किती मोठे आहे हे सहज लक्षात येते. आणि आता नरेंद्र मोदीदेखील त्याच स्थानमहात्म्याची अनुभूती घेत आहेत, त्याचा सकारात्मक अनुभव त्यांना आणि त्यांच्या रूपाने संपूर्ण देशाला अनुभवायला मिळेल अशी आशा बाळगूया. 

Web Title: 131 years ago Narendra became Vivekananda by meditation; Modi's 3 days of meditation is also a coincidence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.