२०२५ला अंगारक चतुर्थी किती-कधी? १ महिन्यात ३ व्रतांचा महायोग, विनायक-संकष्टीची पाहा यादी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:59 IST2024-12-31T09:58:02+5:302024-12-31T09:59:52+5:30
All Vinayak Chaturthi And Sankashti Chaturthi In The Year 2025 Date List: सन २०२५ची सुरुवात होत आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षांत विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या तारखा काय? अंगारक योग किती? एकाच महिन्यात ३ चतुर्थी येण्याचा योग कधी? पाहा, संपूर्ण यादी एकाच क्लिकवर...

२०२५ला अंगारक चतुर्थी किती-कधी? १ महिन्यात ३ व्रतांचा महायोग, विनायक-संकष्टीची पाहा यादी!
All Vinayak Chaturthi And Sankashti Chaturthi In The Year 2025 Date List: गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते.
सन २०२५चा शुभारंभ होत आहे. सन २०२४ मध्ये केलेल्या चुका टाळून, सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी करण्याची सुरुवात होणार आहे. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष २०२५ सुरू होत आहे. अनेकार्थाने २०२५ हे वर्ष विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे. २०२५ मध्ये असा एक महिना आहे, ज्या महिन्यात ३ चतुर्थीचा अद्भूत महायोग जुळून आलेला आहे. तर सन २०२५ वर्षाची सुरुवात आणि सांगता विनायक चतुर्थीने होत आहे. २०२५ मध्ये वर्षभर येणाऱ्या विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी तारीख, विनायक चतुर्थीचा अंगारक योग आणि संकष्ट चतुर्थीचा अंगारक योग जाणून घेऊया...
विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक
प्रत्येक मासाच्या शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते. तर ज्या कृष्ण चतुर्थीला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते. हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे. प्रत्येक मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे. मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या. गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत, असे म्हटले जाते.
विनायक आणि संकष्ट चतुर्थी व्रत पद्धत
संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. उपास शक्य नसेल, तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ‘ॐसिद्धिविनायकाय नम:’, ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ वेळा तर कमाल यथाशक्ती जप करून व्रतपूर्ती करावी, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे अथर्वशीर्ष म्हणून गणेशाची पूजा करावी. अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही, शांत असते, संकटकाळातही स्थिर असते, अशा गजाननाचे स्तोत्र. हे स्तोत्र मनोभावे पठण केले असता, तसेच या स्तोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्र आवर्तने केली असता, वाचासिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे.
सन २०२५ मध्ये येणाऱ्या विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी
सन २०२५ मधील महिने | विनायक चतुर्थी वार आणि तारीख | संकष्ट चतुर्थी वार आणि तारीख |
जानेवारी २०२५ | पौष महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शुक्रवार, ०३ जानेवारी २०२५ | पौष महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, १७ जानेवारी २०२५ |
फेब्रुवारी २०२५ | माघ महिना शुद्ध पक्ष (श्रीगणेश जयंती) - वरद तिलकुंद विनायक चतुर्थी - शनिवार, ०१ फेब्रुवारी २०२५ | माघ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ |
मार्च २०२५ | फाल्गुन महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - सोमवार, ०३ मार्च २०२५ | फाल्गुन महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - सोमवार, १७ मार्च २०२५ |
एप्रिल २०२५ | चैत्र महिना (मराठी नववर्ष) शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, ०१ एप्रिल २०२५ | चैत्र महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - बुधवार, १६ एप्रिल २०२५ |
मे २०२५ | वैशाख महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - गुरुवार, ०१ मे २०२५ | वैशाख महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, १६ मे २०२५ |
ज्येष्ठ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शुक्रवार, ३० मे २०२५ | ||
जून २०२५ | ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शनिवार, १४ जून २०२५ | |
आषाढ महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शनिवार, २८ जून २०२५ | ||
जुलै २०२५ | आषाढ महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - सोमवार, १४ जुलै २०२५ | |
श्रावण महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - सोमवार, २८ जुलै २०२५ | ||
ऑगस्ट २०२५ | श्रावण महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ | |
भाद्रपद महिना शुद्ध पक्ष (गणेशोत्सव) - श्रीगणेश चतुर्थी - बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ | ||
सप्टेंबर २०२५ | भाद्रपद महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - बुधवार, १० सप्टेंबर २०२५ | |
अश्विन महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ | ||
ऑक्टोबर २०२५ | अश्विन महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ | |
कार्तिक महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५ | ||
नोव्हेंबर २०२५ | कार्तिक महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५ | |
मार्गशीर्ष महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी - सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ | ||
डिसेंबर २०२५ | मार्गशीर्ष महिना कृष्ण पक्ष - संकष्ट चतुर्थी - रविवार, ०७ डिसेंबर २०२५ | |
पौष महिना शुद्ध पक्ष - विनायक चतुर्थी अंगारक योग - मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ |
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया||